
गेल्या बुधवारी अमेरिकेमध्ये कोरोनामुळे 3,900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
वॉशिंग्टन : गेल्या एका वर्षापासून जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनावरील लशीला अनेक देशांनी आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे. काल शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेने फायझरच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. असं असलं तरीही अद्याप परिस्थिती संपूर्णत: नियंत्रणात येणे तातडीने शक्य नाहीये. अमेरिकेसारख्या विकसित देशात कोरोनामुळे खूपच नुकसान झाले आहे. अमेरिकेमध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा आता दोन कोटींच्या पार गेला आहे.
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीकडून म्हटलं गेलंय की शुक्रवारी नव्या वर्षाच्या सुरवातीलाच देशात संक्रमितांची संख्या या मोठ्या गंभीर आकड्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 20,007,149 कोरोनाचे संक्रमित आढळले आहेत. आणि यापैकी 346,408 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या भीषण अशा आकडेवारीमुळे अमेरिका हा देश जगातील सर्वाधिक कोरोना संक्रमित तसेच कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेला देश बनला असल्याची माहिती युनिव्हर्सिटीकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - अमेरिकेने दहशतवाद्यांचा निधी रोखला
गेल्या बुधवारी अमेरिकेमध्ये कोरोनामुळे 3,900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा एक नवा रेकॉर्ड मानला जातोय. गेल्या आठवड्यात दैनंदिन संक्रमितांची सरासरी 178,000 पेक्षा जास्त आहे. तर दैनंदिन मृत्यूची सरासरी 2,280 आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सर्वाधिक खराब परिस्थिती येणे अद्याप बाकी आहे. एका अन्य कोरोना ट्रेकिंग प्रोजेक्टच्या नुसार 125,000 हून अधिक पीडित लोक कोरोना व्हायरसवर उपचार करुन घेत आहेत.
तर दुसरीकडे अमेरिकेत सध्या लशीकरणास सुरवात झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत जवळपास 2.8 दशलक्ष लोकांना लशीचा पहिला खुराक दिला गेला आहे. अमेरिकेनंतर जगात भारतातच कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. भारतात देखील काल शुक्रवारी ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे. लवकरच भारतात देखील कोरोनाचे लशीकरण सुरु करण्यात येणार आहे.