व्हॅक्सिनबद्दल हॅरिस यांच्या वक्तव्याने राष्ट्राध्यक्षांची विश्वासार्हता कमी होऊ शकते - माइक पेन्स

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

प्रेसिडेन्शियल डिबेटनंतर आता व्हाइस प्रेसिडेन्शियल डिबेट पार पडलं. यामध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि उपराष्ट्रपती माइक पेन्स आमने सामने आले होते.

वॉशिंगटन - अमेरिकेच्या निवडणूकीची रंगत आता वाढत चालली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, प्रेसिडेन्शियल डिबेटनंतर आता व्हाइस प्रेसिडेन्शियल डिबेट पार पडलं. यामध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि उपराष्ट्रपती माइक पेन्स आमने सामने आले होते. यावेळी कमला हॅरिस यांनी कोरोना व्हायरसच्या परिस्थितीवरून ट्रम्प यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. अमेरिकेत आतापर्यंत कोणतंच सरकार इतकं अपयशी ठरलेलं नाही. 

कमला हॅरिस म्हणाल्या की, अमेरिकन नागरिक या गोष्टीचे साक्षी आहेत की देशाच्या इतिहासात कोणतंच सरकार इतक्या वाईट पद्धतीनं अपय़सी ठरलेलं नाही. जर पब्लिक हेल्थ प्रोफेशन्स, डॉक्टर फौसी किंवा इतर डॉक्टर जर कोरोना व्हॅक्सिन घेण्याचा सल्ला देत असतील तर जरूर घेईन पण ट्रम्प सांगत असतील तर मी घेणार नाही. याशिवाय कोरोनाच्या संकटात केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरल्याचं म्हणत कमला हॅरिस यांनी ट्रम्प सरकारला घेरलं. 

कोरोना व्हॅक्सिनबाबत कमला हॅरिस यांच्या वक्तव्यावर माइक पेन्स यांनी जोरदार पलटवार केला. पेन्स म्हणाले की, व्हॅक्सिनबाबत जनतेच्या मनात असलेला विश्वास कमी करण्याचा प्रयत्न हॅरिस यांच्याकडून केला जात आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होतील असंही पेन्स यांनी यावेळी म्हटलं.

जगात सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आढळले आहेत. आतापर्यंत जवळपास 75 लाख लोकांना कोरोनाचा ससंर्ग झाला आहे. तर 43 लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे मृतांचा आकडा 2 लाख 10 हजारांहून अधिक झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america vice presidential debate kamla harris and mike pence