अमेरिका पुन्हा पेटली; कृष्णवर्णीयावरील गोळीबारानंतर आंदोलनाला हिंसक वळण

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 26 August 2020

जॉर्ज फ्लॉइड प्रकरणानंतर अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचारांचा विषय अधिक संवेदनशील झाला असून त्याविरोधात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत.

वॉशिंग्टन- जेकब ब्लेक या कृष्णवर्णीय व्यक्तीवर गोळीबार केल्याच्या निषेधार्थ तीन दिवसांपासून विस्कॉन्सिन राज्यातील केनोशा येथे सुरु असलेल्या आंदोलनात आज दोन जणांचा बळी गेला. आंदोलनाला हिंसक वळण लागून झालेल्या गोळीबारात या दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. हा गोळीबार कोणी केला, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. 

जॉर्ज फ्लॉइड प्रकरणानंतर अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचारांचा विषय अधिक संवेदनशील झाला असून त्याविरोधात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत. काही दिवसांपूर्वी घरगुती हिंसाचाराबाबत पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिस जेकब ब्लेक या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या घराजवळ आले. यावेळी पोलिसांनी जेकबवर अनेक गोळ्या झाडल्या. यामुळे त्याच्या कमरेखालच्या भागाला जबर दुखापत झाली आहे. या प्रकरणात कोणते पोलिस सहभागी होते, गोळीबाराआधी काय झाले होते याबाबत स्पष्टता नाही. 

अमेरिकेचा मैत्रीचा दावा खोटा? भारताची पाकिस्तान, सीरियासोबत केली तुलना

या घटनेनंतर संतप्त जनतेने पोलिसांविरोधात तीन दिवसांपासून मोठे आंदोलन सुरु केले आहे. काल रात्री आंदोलनाला हिंसक वळण लागून त्यात गोळीबार झाला आणि दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका रायफलधारी व्यक्तीच्या मागे संतप्त जमाव पळत असल्याचे दिसत आहे. तो जमिनीवर पडल्यावर त्याने जमावाच्या दिशेने गोळ्या झाडल्या.

निदर्शकांनी अनेक वाहनांना आग लावली. शिवाय सरकारी इमारतींची तोडफोडही झाली आहे. उपद्रवी लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्याचे गव्हर्नर टोनी एवर्स यांनी आणीबाणीची घोषणा करत नॅशनल गार्डला पाचारल केले आहे. 29 वर्षाच्या कृष्णवर्णीय जेकब ब्लेकला पोलिसांनी गोळी मारली होती. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत आंदोलन पेटले आहे. जेकब यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलावर चालवण्यात आलेल्या गोळ्यांमुळे शरीरात 8 छिद्रे पडले आहेत. जेकबच्या शरीराचा एक भाग काम करणे बंद झाला आहे. सर्जरीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

व्हिडिओमध्ये पूर्ण घटना कैद

गोळीबाराची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजताची आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चित्रीत करण्यात आला आहे. यात एक कृष्णवर्णीय व्यक्ती फुटपाथवर चालत आपल्या गाडीसमोर येतो आणि चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडतो. त्याच वेळी एक पोलिस अधिकारी त्याच्या दिशेने बंदूक रोखून ओरडतो. जेव्हा तो गाडीच्या दरवाज्यातून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी एक पोलिस त्याचा शर्ट पकडून त्याला मागे खेचतो आणि त्याच्यावर गोळ्या चालवणे सुरु करतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: America Violent turn to agitation after firing on blacks jacob blake