
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी काल सोमवारी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय जाहीर करताना ते म्हणाले की, येणारे काही आठवडे आतापर्यंतचे कठीण आठवडे असतील मात्र माझा विश्वास आहे की आपण या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत.
WATCH LIVE: My update on coronavirus. (4 January 2021) https://t.co/ZL6PeAGWPl
— Boris Johnson (@BorisJohnson) January 4, 2021
पुढे त्यांनी म्हटलं की, जर मृत्यूदर घटला आणि लशीकरणाचा अपेक्षित परिणाम साधला तर आपण लवकरच फेब्रुवारी 2021 मध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ शकू. आपण इतिहासातील सर्वांत मोठी लशीकरणाचा कार्यक्रम पार पाडत आहोत. आपण इतर युरोपियन देशांहून अधिक असलेल्या ब्रिटनमधील मोठ्या लोकसंख्येचे लशीकरण करत आहोत, असंही त्यांनी म्हटलं.
हा देशव्यापी लॉकडाऊन फेब्रुवारी मध्यापर्यंत कार्यान्वित राहिल. ब्रिटन सरकारने जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार, गरजेची नसलेली सर्व दुकाने आणि इतर सेवा बंद राहतील. देशातील हॉटेल्स 'टेकआऊट सर्व्हीसेस' पद्धतीने सुरु राहतील. शिवाय, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आणि कॉलेजेस देखील बंद राहतील. युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना देखील फेब्रुवारी मध्यापर्यंत कॅम्पसमध्ये परतू नये असा आदेश देण्यात आला आहे.
हेही वाचा - जॅक मा पहिले नाहीत; चीनने याआधीही दाबलाय विरोधकांचा आवाज
कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सापडल्यानंतर तिथे अत्यंत गतीने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 30 टक्क्यांनी अधिक रुग्णांची भर या आठवड्यात झाली आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती आणखीन बिघडून हाताबाहेर जाऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.