esakal | भारताला 'अम्फन' वादळ पडले १४ अब्ज डॉलरला; UNचा अहवाल

बोलून बातमी शोधा

Amphan Cyclone

२०२० हे वर्ष कोरोना संसर्गाबरोबरच पर्यावरणातील तीव्र बदलांमुळेही लक्षात राहणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे.

भारताला 'अम्फन' वादळ पडले १४ अब्ज डॉलरला; UNचा अहवाल
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / पीटीआय

न्यूयॉर्क : गेल्या वर्षी भारत-बांगलादेश सीमेवर धडकलेले अम्फन वादळ उत्तर हिंदी महासागर क्षेत्रात आलेल्या सर्व वादळांपैकी सर्वाधिक नुकसान करणारे ठरल्याचे संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. या वादळामुळे भारताला १४ अब्ज डॉलरचा फटका बसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘जागतिक पर्यावरणाची स्थिती २०२०’ हा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केला आहे. वातावरणातील तीव्र बदल आणि कोरोना संसर्गाची लाट यामुळे गेल्या वर्षी कोट्यवधी नागरिकांना फटका बसल्याचे या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा: ब्रिटनमध्ये कोविड संसर्गाचा वेग मंदावला

जगभरात टाळेबंदीमुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला असतानाही पर्यावरण बदलाच्या वेगावर त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचेही सिद्ध झाले आहे. २०२० हे वर्ष आतापर्यंतच्या तीन सर्वांत उष्ण वर्षांपैकी एक म्हणून नोंदले गेले. औद्योगिकीकरण पूर्व (१८५० ते १९००) काळाच्या तुलनेत जागतिक तापमानात १.२ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. २०११ ते २०२० हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण दशक ठरले आहे. हा अहवाल धोक्याचा इशारा देणारा असून त्याची जगातील सर्वच देशांनी गांभीर्याने दखल घेण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: कोरोनाला कसं रोखणार? सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

२०२० हे वर्ष कोरोना संसर्गाबरोबरच पर्यावरणातील तीव्र बदलांमुळेही लक्षात राहणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात ३० मोठी चक्रीवादळे आली. यापैकी सर्वाधिक वादळ उत्तर अटलांटिक समुद्रात सर्वाधिक वादळे निर्माण झाली. एकूण वादळांपैकी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फन वादळाने भारत-बांगलादेशला चांगलाच तडाखा देत भारताचे १४ अब्ज डॉलरचे नुकसान केले. या भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळांपैकी सर्वाधिक नुकसान करणारे म्हणून याची नोंद झाली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्याने मोठी जिवीतहानी टळली असली तरी भारत आणि बांगलादेशमध्ये मिळून १२९ जणांचा वादळात मृत्यू झाला. वादळामुळे भारतात २४ लाख, तर बांगलादेशात २५ लाख लोक विस्थापित झाले.

हेही वाचा: उद्धव ठाकरे-अदर पूनावाला यांच्यात बैठक; लसींच्या पुरवठ्याबाबत झाली चर्चा

पावसामुळे शेकडो जणांचा मृत्यू

गेल्या वर्षी भारतासह शेजारी देशांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडला. भारतात सरासरीपेक्षा ९ टक्के अधिक पाऊस पडला. २०२० या वर्षात मुसळधार पाऊस, पूर, दरडी कोसळणे यामुळे भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि म्यानमार या देशांमध्ये दोन हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमध्ये ढगफुटीमुळे १४५ जणांच्या आणि म्यानमारमध्ये दरड कोसळून झालेल्या १६६ जणांच्या मृत्यूचा समावेश आहे.