esakal | ब्रिटनमध्ये कोविड संसर्गाचा वेग मंदावला

बोलून बातमी शोधा

Coronavirus
ब्रिटनमध्ये कोविड संसर्गाचा वेग मंदावला
sakal_logo
By
पीटीआय

लंडन - कोरोना रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम वेगान सुरू असताना त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ब्रिटनमध्ये ७ सप्टेंबर रोजी तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर कोरोना लाटेने संख्येत वाढ होत गेली. परंतु लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर तेथे आता केवळ चार मृत्युंची नोंद झाली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा दर गेल्या सोमवारच्या तुलनेत ७० टक्क्यांने घसरला. याशिवाय ब्रिटनमध्ये कोरोनावाढीचा वेग देखील १७ टक्क्याने कमी झाला आहे.

गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये ३५६८ जण बाधित झाले होते. परंतु गेल्या चोवीस तासात ही संख्या २९६३ वर आली आहे. लसीकरणामुळे ब्रिटनच्या नागरिकांत उत्साह पसरला असून यावर्षी आणखी बुस्टर डोस घेण्याची तयारी केली जात आहे. बुस्टर डोसमुळे कोरोनाच्या कोणत्याही प्रकाराचा सामना करण्याची शक्ती येणार आहे. आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले की, कोणत्याही स्थितीत जून महिन्यांपर्यंत लॉकडाउनमधून बाहेर येण्याचा ब्रिटनचा प्रयत्न असेल. त्यामुळे जुलैखेरीसपर्यंत देशातील ज्येष्ठ नागरिकांना लशीचा पहिला डोस दिला जाईल.

पाकमधील अनेक शहरांत टाळेबंदी शक्य

इस्लामाबाद : कोरोना संसर्गाची स्थिती अत्यंत गंभीर बनल्याने पाकमधील अनेक मोठ्या शहरांमध्ये टाळेबंदी लागू करावी लागणार असल्याचे सरकारमधील मंत्री असाद उमर यांनी सांगितले. ‘देशातील रुग्णालये भरत असून आपण आताच काळजी घेतली नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल,’ असा इशारा उमर यांनी देशवासियांना दिला आहे. पाकिस्तानात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची अधिकृत संख्या १६,६०० इतकी आहे.

हेही वाचा: प्राण्यांनाही कोरोनाची लागण; अमेरिकेतील मत्स्यालयात कोरोनाच शिरकाव

व्हर्जिनियात तयार होतेय प्रभावी लस

नवी दिल्ली - सध्या देशभरामध्ये विविध कोरोना प्रतिबंधक लशींच्या निर्मितीवर काम सुरू असून अमेरिकेत एका लसीच्या पहिल्या टप्प्यात प्राण्यांवर झालेल्या प्रयोगातून सकारात्मक निष्कर्ष हाती आले असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. ही लस अस्तित्वात असलेल्या कोरोनाच्या स्ट्रेन्सना तसेच भविष्यामध्ये येऊ घातलेल्या संसर्गाला रोखण्यास पूर्ण समर्थ असल्याचे दिसून आले आहे. ही लस सर्वसामान्यांना अगदी माफक दरामध्ये म्हणजे १ डॉलरपर्यंत उपलब्ध होऊ शकेल. व्हर्जिनिया विद्यापीठातील संशोधकांनी ही लस तयार केली असून तिने पहिल्या टप्प्यातील प्रयोगामध्ये डुकरांचा कोरोनाच्या विषाणूपासून बचाव केल्याचे आढळून आले आहे. पोर्साइन इपिडेमिक डायरिया व्हायरस (पीईडीव्ही) या विषाणूची डुकरांना बाधा होते. माणसाला याची बाधा झाल्यानंतर रुग्णांना डायरिया, मळमळणे आणि ताप असा त्रास होऊ लागतो. जगभरातील डुकरांना सामान्यपणे याच विषाणूचा संसर्ग होताना दिसतो. नव्याने विकसित होणाऱ्या लसीची साठवणूक आणि वाहतूक करणे देखील सोपे असल्याने जगभरातील दुर्गम भागातील लसीकरणाला त्यामुळे वेग येऊ शकतो.