रशिया बदलणार युक्रेनचा नकाशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Announcement of merger four regions

रशिया बदलणार युक्रेनचा नकाशा

किव्ह : रशियाच्या सैनिकांनी ताबा मिळविलेल्या युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागातील चार प्रदेशांचे विलिनीकरण करणार असल्याचे रशियाने आज अधिकृतरित्या जाहीर केले. सार्वमताच्या आधारावरच हा निर्णय घेतला असल्याचा दावा रशियाने केला असला तरी या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. हा आमच्यावरील हल्ला असून हे विलिनीकरण बेकायदा असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये शुक्रवारी (ता. ३०) विलिनीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी युक्रेनमधील झॅपोरिझ्झिया, दोन्तेस्क, खेरसन आणि लुहान्स्क या चार प्रदेशांचे प्रतिनिधी विलिनीकरणाच्या करारावर सह्या करतील, असे रशियाचे सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले. युक्रेनच्या पूर्व भागातील लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठीच रशियाने लष्करी कारवाई केली होती आणि गेल्या आठवड्यात झालेल्या सार्वमतावेळी जनतेने अत्यंत उत्साहाने रशियाच्या बाजूने मतदान केले होते, असा दावाही पेस्कोव्ह यांनी केला.

सार्वमताबाबत आरोप

ताबा मिळविलेल्या प्रदेशात रशियाचे सैनिक घरोघरी गेले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून नागरिकांकडून रशियाच्या बाजूने मतदान करवून घेतले, असा आरोप जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालिना बेरबॉक यांनी केला आहे. चारही प्रदेशांमध्ये रशियाच्या बाजूने पडलेल्या मतांची टक्केवारी प्रचंड असल्याने हे मतदानच संशयास्पद असल्याचे सिद्ध होते, असा दावाही त्यांनी केला.

अमेरिकेकडून युक्रेनला रॉकेट यंत्रणा

वॉशिंग्टन : रशियाने युक्रेनचा नकाशा बदलला असतानाच अमेरिकेने मात्र युक्रेनला अतिरिक्त १८ रॉकेट यंत्रणा देण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या ड्रोन हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अमेरिकेने हा शस्त्रपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या रॉकेट यंत्रणेची किंमत एक अब्ज दहा कोटी डॉलर इतकी आहे. अमेरिकेने युक्रेनला अद्याप १७ अब्ज डॉलरची मदत केली आहे.