जगातील एक खंड जिथं कोरोनाला अजुनही नो एन्ट्री; बिनधास्त फिरतायत लोक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे बहुतेक देशांनी लॉकडाउन जाहीर केले होते. सुरक्षित अंतर आणि तोंडावर मास्क लावणे तर अनिवार्य असल्याने तो आता सवयीचाच भाग होत आहे.

जोहानसबर्ग - कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे बहुतेक देशांनी लॉकडाउन जाहीर केले होते. सुरक्षित अंतर आणि तोंडावर मास्क लावणे तर अनिवार्य असल्याने तो आता सवयीचाच भाग होत आहे. पण कोरोना विषाणूंपासून अंटार्टिका अद्याप मुक्त आहे. येथे या आजाराचा शिरकाव न झाल्याने जनजीवन नेहमीसारखे सुरळीत आहे. कोणत्याही निर्बंधांविना लोक बिनधास्त फिरू शकतात.

सध्या जगातील अंटार्टिका हा एकमेव खंड कोरोनाच्या विळाख्यापासून दूर आहे. येथे सध्या एक हजार शास्त्रज्ञांचे संशोधनासाठी वास्तव्य आहे. येथील हिवाळ्यांत अनेक महिने किंवा आठवड्यांत प्रथमच सूर्यदर्शन घेत असताना यापुढे येथे येणाऱ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा शिरकाव या प्रदेशात होऊ नये, यासाठीही प्रयत्न करीत आहेत. अंटार्क्टिका द्वीपकल्पापासून लांब असलेल्या ब्रिटनच्या रोथेरा संशोधन तळावरील संशोधन प्रमुख रॉब टेलर यांनी ते तेथे सुरक्षित वातावरणात असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, ‘‘ कोरोनापूर्व काळात जेव्हा उर्वरित जगातील जीवनमान अत्यंत मनोहारी होते त्या वेळी अंटार्टिकामधील संशोधक दीर्घकाळ एकांतवास, स्वावलंबन आणि मानसिक ताण सहन करीत होते. पण कोरोनामुळे अन्य देशांतही असाच अनुभव नागरिकांना अनुभवावा लागत आहे. लॉकडाउनच्या काळात ब्रिटनपेक्षा आम्ही मुक्तपणे वावरू शकत होतो.’’ टेलर हे गेल्या ऑक्टोबरमध्ये अंटार्टिकात आले आहेत. टेलर व त्यांचे २६ सहकारी हे जगापासून लांब राहूनही अनेक कामे कुशलतेने करीत आहेत.

हे वाचा - ट्रम्प यांच्या मुत्सद्दीपणाला यश! आणखी एका अरब राष्ट्राची इस्त्राईलसोबत मैत्री

अंटार्टिकाला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी...
- ‘कौन्सिल ऑफ मॅनेजर्स ऑफ नॅशनल अंटार्टिक प्रोग्रॅम’साठी (सीओएमएनएपी) ३० देश एकत्र
- हवाई व जल वाहतुकीद्वारे अंटार्टिकासाठी प्रवेश केला जात असल्याने तेथे विषाणूंच्या प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना.
- पर्यटकांशी संपर्क, जहाज नांगरण्यास मनाई
- तेथे संशोधकांची जे गट जवळ आहे, त्यांना एकमेकांना भेटण्यास व तळावर सार्वजनिक कार्यक्रमास बंदी. 

भारतात कोरोनाचा कहर; पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं सावध

लहान खोलीत एकत्र राहून सामाजिक पर्यावरणाचा अनुभव घेत स्वयंपाक करणे आणि हवामानाची निरीक्षणे नोंदविण्यासारखी अनेक कामे त्यांना कठीण वातावरणात करावा लागतात. इंटरनेटच्या आधारे त्यांना कोरोनामुळे उर्वरित पृथ्वीवर जो उद्रेक झाला आहे, त्याच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोचतात. यामुळे नव्या गोष्टींचा स्वीकार करण्यास आम्हाला मदत होणार आहे. सुरक्षित अंतरासारख्या निर्बंधांची सवय आम्हाला अजून झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: antarctica only continent which free from corona virus till