ट्रम्प यांच्या मुत्सद्दीपणाला यश! आणखी एका अरब राष्ट्राची इस्त्राईलसोबत मैत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 12 September 2020

संयुक्त अरब अमिरातीनंतर आता बहारिननेही इस्त्राईलसोबत संबंध सुरळीत करण्यासाठी पहल केली आहे.

मनामा- संयुक्त अरब अमिरातीनंतर आता बहारिननेही इस्त्राईलसोबत संबंध सुरळीत करण्यासाठी पहल केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मध्यस्थाचं काम केलं आहे. त्यांनी शुक्रवारी इस्त्राईल आणि बहारिन यांच्यातील मैत्री कराराची घोषणा केली. बहारिन हा इस्त्राईलसोबत करार करणारा चौथा अरब राष्ट्र ठरला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू आणि बहारिनचे राजे हमाद बीन इसा अल खलिफा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या तीन नेत्यांनी संयुक्त निवेदन जाहीर केले असून कराराची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन 'आणखी एक ऐतिहासिक घटना' असं म्हटलंय.

कॅनाडाला जमलं! गेल्या 24 तासांत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये इस्त्राईल आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील शांतता करारावर शिक्कामोर्तब होणार आहे. बहारिनचे परराष्ट्रमंत्री यावेळी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. बहारिननेही इस्त्राईलसोबत संबंध जोडण्याची तयारी दाखवल्याने ट्रम्प यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी मोठे यश प्राप्त झाले आहे. यामुळे ट्रम्प यांना ज्यू समर्थक ख्रिश्चनांचा पाठिंबा मिळणार आहे.  

मीडल इस्टमधील शांततेसाठी ही एक ऐतिहासिक घटना आहे. दोन्ही देशांमध्ये थेट संपर्क प्रस्थापित झाल्याने सकारात्मक बदल होतील, तसेच मीडल इस्टमध्ये शांतता, स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी हे महत्वाचे पाऊल ठरेल, असं इस्त्राईल-अमेरिका- बहारिन यांनी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणण्यात आलं आहे. 

भारतात कोरोनाचा कहर; पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं सावध

इस्त्राईल-बहारिन करारामुळे दोन्ही देशांमधील मुत्सद्दी, व्यावसायिक, सुरक्षा आणि अन्य संबंध सामान्य होणार आहेत. सौदी अरेबियासोबत बहारिननेही इस्त्राईलच्या विमानांसाठी आपले हवाईक्षेत्र खुले केले आहे. एका महिन्यात दुसऱ्या अरब राष्ट्राने इस्त्राईलशी करार केला. याआधी इजिप्त आणि जॉर्डन या अरब राष्ट्रांनी इस्त्राईलसोबत करार केला होता. 

दरम्यान, एकामागोमाग एक अरब राष्ट्र इस्त्राईलसोबत शांतता करार करत आहेत. त्यामुळे पॅलेस्टिनची चिंता वाढली आहे. युएईसह बहारिननेही इस्त्राईलसोबत कधी युद्ध केले नाही. शिवाय या देशांची सीमा इस्त्राईलसोबत लागून नाही. बहारिनच्या करारामुळे पंतप्रधान नेतन्याहू यांची प्रतिष्ठा वाढणार आहे. सध्या नेतन्याहू यांच्याविरोधात देशात भ्रष्टाचाराचा खटला सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest Arab nation to recognise Israel donald trump meditate