अनुष्काचा "परी' इस्लामविरोधी - पाकिस्तान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 मार्च 2018

चित्रपटात हिंदू मंत्र आणि कुरआनमधील आयतांची सरमिसळ केली आहे. शिवाय कुरआनमधील शिकवणीचा वापर काळ्या जादूसाठी करून मुस्लिमविरोधी चित्रण केले आहे, असा आरोप सेन्सॉर बोर्डाने केल्याचे "जिओ'ने म्हटले आहे

नवी दिल्ली - अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा नुकताच प्रदर्शित झालेला "परी' या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घातली आहे. या चित्रपटात इस्लामविरोधी संस्कार, मुस्लिमविरोधी भावना व काळ्या जादूला प्रोत्साहन दिले असल्याची टीका करून तो पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यास तेथील सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे, असे वृत्त तेथील एका वृत्तपत्राने दिले आहे.

कुरआनमधील शिकवणीबद्दल यात आक्षेपार्ह दृश्‍य असल्याचा दावा सेन्सॉर बोर्डाने केला आहे, येथील वृत्तवाहिनी "जिओ टीव्ही'ने म्हटले आहे. यासाठी चित्रपटगृहांच्या मालकांचे म्हणणेही दिले आहे. या चित्रपटात हिंदू मंत्र आणि कुरआनमधील आयतांची सरमिसळ केली आहे. शिवाय कुरआनमधील शिकवणीचा वापर काळ्या जादूसाठी करून मुस्लिमविरोधी चित्रण केले आहे, असा आरोप सेन्सॉर बोर्डाने केल्याचे "जिओ'ने म्हटले आहे. "परी'चे पटकथा संवाद व कथा आमच्या इस्लमी मूल्यांविरोधात आहे. जादूबाबत इस्लममध्ये वेगळी संकल्पना आहे. मात्र या चित्रपटामुळे काळी जादू आणि आमच्या धर्माच्या मूल्यांचे विसंगत विचारांना प्रेक्षकांना बळी पाडले जाईल, असा दावा बोर्डाच्या वरिष्ठ सदस्याने केला.

सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला पाकिस्तान चित्रपट वितरण संघटनेने पाठिंबा दिला आहे. या चित्रपटासाठी ज्या प्रेक्षकांनी आगाऊ आरक्षण केले आहे, त्यांना तिकिटाचे पैसे परत करण्यात येणार असल्याचे तेथील "न्यूप्लेक्‍स सिनेमा' या चित्रपटगृह कंपनीने फेसबुक पेसवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anushka sharma pakistan pari movie