सहकार्य वाढविण्यास वाव - नरेंद्र मोदी

पीटीआय
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

‘आसियान’चे महत्त्व
भारत आणि ‘आसियान’ देशांची एकूण लोकसंख्या १.८५ अब्ज असून, ती जगाच्या एकचतुर्थांश आहे. या सर्व देशांचे एकत्रित सकल राष्ट्रीय उत्पन्न ३.८ ट्रिलियन डॉलर आहे. गेल्या १७ वर्षांमध्ये ‘आसियान’ देशांमधून भारतात ७० अब्ज डॉलरची गुंतवणूक आली आहे.

बॅंकॉक - ‘आसियान’ गटाबरोबर अनेक पातळ्यांवर संबंध वाढविण्याबाबतचा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-आसियान परिषदेत सादर केला. या परिषदेच्या उद्‌घाटनाच्या भाषणात मोदींनी ‘आसियान’बरोबर भूपृष्ठ, सागरी आणि हवाईमार्गाने दळणवळण वाढविण्यावर भर दिला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात आग्नेय आशियाई देशांची संघटना असलेल्या आसियानच्या दहा सदस्य देशांच्या गटाचा दबदबा आहे. भारत आणि आसियानमधील संबंध वाढल्यास सर्वांचीच आर्थिक प्रगती होण्यास हातभार लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी या वेळी बोलताना केले. 

मोदी म्हणाले, ‘‘सागरी सुरक्षा आणि सागरी व्यापार या क्षेत्रांमध्ये भारत आणि आसियान देशांमध्ये सहकार्य वाढविण्यास मोठा वाव आहे. याशिवाय कृषी, अभियांत्रिकी, डिजिटल तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढू शकते.’’

भारत-पॅसिफिक प्रदेशाच्या विकासाबाबत भारताचे आणि आसियानचे मत एकच आहे. त्याचा या क्षेत्राच्या विकासासाठी फायदा होईल. भारताने ॲक्‍ट ईस्ट या धोरणावर लक्ष केंद्रित केले असून, आसियान देशांना यात मोठे महत्त्व आहे, असे मोदी यांनी सांगितले.

इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया हे दहा देश ‘आसियान’चे सदस्य असून भारत, अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह काही देश ‘आसियान’ परिषदेचे निमंत्रित देश आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि ‘आसियान’ यांच्यातील संबंध दृढ होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: asian conference narendra modi