'एफ-16'च्या गैरवापराबद्दल पाककडे मागितला खुलासा 

पीटीआय
शनिवार, 2 मार्च 2019


"एफ-16' विमानांच्या वापरासंदर्भात अमेरिका आणि पाकिस्तान दरम्यान करार झाला आहे. या कराराचा भंग झाला आहे का, याबाबतच्या निष्कर्षावर येण्यापूर्वी आम्ही सर्व माहिती पडताळून पाहात आहोत. त्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.

- कोने फॉल्कनर, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते 

वॉशिंग्टन : भारताच्या विरोधातील कारवाईवेळी अमेरिकी बनावटीच्या "एफ-16' लढाऊ विमानांच्या संभाव्य गैरवापराबद्दल पाकिस्तानकडे थेट खुलासा मागविला असल्याचे आज अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. "एफ-16' विमानांच्या वापराबाबतच्या कराराचा पाकिस्तानकडून भंग झाला आहे का? याबाबतही आम्ही माहिती घेत आहोत, असे अमेरिकेने म्हटले आहे. 

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल कोने फॉल्कनर यांनी "पीटीआय'शी बोलताना सांगितले की, भारताबरोबरच्या संघर्षावेळी पाकिस्तानकडून अमेरिकी बनावटीच्या "एफ-16' विमानांचा गैरवापर झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणी आम्ही विस्तृत माहिती मागविली आहे.

अमेरिका हा अत्याधुनिक संरक्षण साहित्याचा जगातील सर्वांत मोठा विक्रेता देश आहे. तसेच, या साहित्याच्या वापराबाबत खरेदी करणाऱ्या प्रत्येक देशाशी अमेरिकेकडून करार केला जातो. संरक्षण साहित्याचा गैरवापर होऊ नये म्हणून या करारात कठोर अटींचा समावेश करण्यात येतो. या कराराचा भंग करण्याच्या घटनेला अमेरिका गांभीर्याने घेते. त्यामुळे "एफ-16' विमानांच्या गैरवापराबाबत अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asked for Pak for misuse of F 16