आनंदाची बातमी! ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी पुन्हा सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 12 September 2020

मागील आठवड्यात एका स्वयंसेवकामध्ये अनेपक्षित आजार दिसून आल्याने लशीची चाचणी थांबवण्यात आले होते.

लंडन- स्वतंत्र परिक्षण घेतल्यानंतर आणि यूकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाला पुन्हा आपल्या लसीची चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मागील आठवड्यात एका स्वयंसेवकामध्ये अनेपक्षित आजार दिसून आल्याने लशीची चाचणी थांबवण्यात आले होते. 

ऑक्सफर्ड (Oxford covid-19 Vaccine) आणि 'अ‍ॅस्ट्राझेनेका' (AstraZeneca) यांनी तयार केलेल्या कोरोनावरील लस तिच्या मानवी चाचणीच्या टप्प्यात होती. 'अ‍ॅस्ट्राझेनेका' आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लशीच्या  (Oxford covid-19 Vaccine) मानवी चाचणीत सामील असलेला एक व्यक्ती आजारी पडला होता. त्यामुळे या लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. 'अ‍ॅस्ट्राझेनेका'ने एक निवेदन जारी करत याबाबतची माहिती दिली होती. हे एक नियमित व्यत्यय (Routine interruptions) आहे, चाचणीत सामील झालेला व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही, असं कंपनीने म्हटलं होतं.

या लसीला एझेडडी -1222  (AZD1222)असे नाव देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या  (WHO) मते, जगातील इतर लसींच्या चाचण्यांच्या तुलनेत ही लस आघाडीवर आहे.  सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात हजारो लोक सामील आहेत. कोरोना लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीमध्ये जवळजवळ 30 हजार लोकांचा समावेश आहे.

स्वदेशी भारत बायोटेकने दिली आनंदाची बातमी; माकडांवरील लशीची चाचणी यशस्वी

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की,  अशा मोठ्या चाचणीत व्यक्ती आजारी पडण्याची सर्व शक्यता आहे, तरीसुध्दा आजारी व्यक्तीची स्वतंत्र तपासणी करणे फार महत्वाचे आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ होती. मात्र, आता पुन्हा एकदा चाचणी सुरु करण्यात आली आहे.

जगभरात कोरोनाच्या लसीवर काम चालू असून या वर्षाच्या अखेरिस अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस येईल असं चित्र होतं. त्यात रशियाने त्यांची लस तयार झाल्याचे ऑगस्ट महिन्यातच जाहीर केलं होतं. शिवाय रशियाने आपली स्पुटनिक v लशीची पहिली बॅच आपल्या नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली असल्याचं कळतंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AstraZeneca and Oxford University resume COVID-19 vaccine trials in the UK