शांततेसाठी विश्‍वासाचे वातावरण आवश्‍यक; राजनाथसिंह यांचा चीनला टोला

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 September 2020

लडाख भागात चीनने केलेली घुसखोरी आणि त्यामुळे निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी चीनच्या उपस्थितीतच त्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

मॉस्को- विश्‍वासाचे वातावरण, आंतरराष्ट्रीय नियमांचा आदर आणि वादावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा ही शांतता आणि सुरक्षिततेची गुरुकिल्ली असल्याचे ठाम प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज शांघाय सहकार्य परिषदेत (एससीओ) केले. पूर्व लडाख भागात चीनने केलेली घुसखोरी आणि त्यामुळे निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी चीनच्या उपस्थितीतच त्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

2500 वर्षांपूर्वीच्या ज्यू संस्कृतीचा शोध; समृद्ध इस्राईली राजवटीतले कोरीव दगड...

‘एससीओ’ आणि इतर काही बैठकांसाठी राजनाथसिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आले आहेत. आज मॉस्को येथे झालेल्या ‘एससीओ’च्या बैठकीत चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंघी यांच्यासह इतर सदस्य देशांचे संरक्षण मंत्री उपस्थित होते. राजनाथ यांनी यावेळी केलेल्या भाषणात भारताची शांततेची भूमिका ठामपणे मांडताना इतिहासातील आक्रमणांची उदाहरणे दिली. राजनाथ म्हणाले,‘‘एका देशाने दुसऱ्या देशावर आक्रमण केल्यास ते अयशस्वी ठरले आहे आणि त्यातून सर्वांचेच मोठे नुकसान होते, हे दुसऱ्या महायुद्धाने जगाला शिकवले आहे. जगाची चाळीस टक्के लोकसंख्या वास्तव्यास असलेल्या ‘एससीओ’ प्रदेशामध्ये शांतता नांदण्यासाठी विश्‍वास आणि सहकार्याचे वातावरण, आक्रमकपणा टाळणे, आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणे आणि एकमेकांच्या हिताचा विचार करणे आवश्‍यक आहे. तसेच, एकमेकांमधील वादावर शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढला जाणेही तितकेच आवश्‍यक आहे.’’

एकही लस 50 टक्केसुद्धा निकष पूर्ण करू शकली नाही; WHO ने दिली धक्कादायक माहिती

गेल्या चार महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील चिनी सैन्याच्या घुसखोरीवरून वाद निर्माण झाला आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही चीनच्या आडमुठेपणामुळे तणाव कायम आहे. चीनने याच आठवड्यात तीन वेळेस घुसखोरीचा प्रयत्नही केला होता, तो भारताने उधळून लावला. राजनाथ यांनी आपल्या भाषणात दहशतवाद आणि कट्टरतावाद या मुद्द्यांनाही हात घातला. सर्व प्रकारच्या दहशतवादाला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना भारताचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजनाथ म्हणाले..

- जागतिक सुरक्षेसाठी भारत कटिबद्ध
- इराणच्या आखातातील परिस्थिती गंभीर
- अफगाणिस्तानमधील परिस्थितीकडे भारताचे लक्ष
- कोरोनाशी लढताना मतभेद विसरुन एक होणे गरजेचे
- लस विकसीत केल्याबद्दल रशियाचे अभिनंदन.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An atmosphere of trust is essential for peace said Rajnath Singh's visit to China