esakal | आता ऑस्ट्रेलियातही भारतातील प्रवाशांना 'नो एन्ट्री'
sakal

बोलून बातमी शोधा

ऑस्ट्रेलियातही भारतातील प्रवाशांना 'नो एन्ट्री'

ऑस्ट्रेलियातही भारतातील प्रवाशांना 'नो एन्ट्री'

sakal_logo
By
नामदेव कुंभार

कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, न्यूझीलंड आणि मालदीवनंतर आता ऑस्ट्रेलियातही भारतीयांना बंदी घातली आहे. कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने भारतामधून येणाऱ्या डायरेक्ट प्रवाशी विमानांवर ऑस्ट्रेलियाने 15 मे पर्यंत बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी मंगळवारी हा निर्णय घेतला. भारत सर्वाधिक लोकसंख्या असणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तसेच सध्या भारतामध्ये कोरोना महामारीची दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अतिशय वेगानं होत आहे. दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.

कोरोना महामारीच्या संकटामुळे भारतामधील परिस्थिती अधिकच भयावह होत चालली आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांचे प्राणही जात आहे. मागील 24 तासांत देशांमध्ये तीन लाख 23 हजार 144 नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक कोटी 76 लाख 36 हजार 307 इतकी झाली आहे. देशात सध्या 28 लैख 82 हजार रुग्ण उपचाराधिन आहेत. मागील 24 तासांत देशात 2771 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वर्षभरात कोरोनामुळे एक लाख 97 हजार 894 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय.

लंडनमध्ये ‘रेड लिस्ट’ची अंमलबजावणी सुरु

भारतातील संसर्गवाढीमुळे ब्रिटनने ‘रेड लिस्ट’मध्ये नाव समाविष्ट केल्यानंतर आता या देशाने आजपासून भारतावर नवे निर्बंध लागू केले आहेत. यामुळे भारतातील प्रवाशांना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतात आढळलेल्या कोरोना विषाणूच्या डबल म्युटंट (बी. १६१७) प्रकाराचा संसर्ग झालेले ५५ रुग्ण आढळल्यानंतर ब्रिटनने रेड लिस्टमध्ये भारताचे नाव टाकले होते. हा विषाणू अधिक वेगाने पसरतो का आणि लसीकरणामुळे या विषाणूपासून बचाव होऊ शकतो का, याचा अभ्यास केला जात आहे.

सिंगापूरकडून नियमावली कडक

मागील १४ दिवसांमध्ये भारतात प्रवास केलेल्या कोणत्याही प्रवाशाला सिंगापूरमध्ये प्रवेश करण्यास किंवा सिंगापूरमार्गे प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. 24 एप्रिलपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरने अधिक कडक नियमावली तयार केली आहे. याशिवाय, जे नुकतेच भारतात जाऊन आले असतील आणि १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला नसेल, त्यांनाही विलगीकरणात जावे लागणार आहे.

loading image