ऑस्ट्रेलियन लेखकाला चीनकडून अधिकृतपणे अटक

पीटीआय
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

ऑस्ट्रेलियन लेखक आणि राजकीय भाष्यकार यांग हेंगजूंग यांना हेरगिरीच्या आरोपांखाली चीनकडून आज अधिकृतपणे अटक करण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. यांग यांना चालू वर्षीच्या जानेवारीमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. 

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन लेखक आणि राजकीय भाष्यकार यांग हेंगजूंग यांना हेरगिरीच्या आरोपांखाली चीनकडून आज अधिकृतपणे अटक करण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. यांग यांना चालू वर्षीच्या जानेवारीमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. 

चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न केल्याबद्दल आणि हेरगिरीचे आरोप ठेवत 23 ऑगस्ट रोजी 54 वर्षीय यांग यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली असल्याचे ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. यांग यांच्याबाबत माहिती मिळविणे अवघड बनले आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मॅरिसे पायने यांनी दिली.

ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेल्या यांग यांना झालेल्या अटकेमुळे सरकार चिंतेत आहे. या अवघड क्षणी आम्ही यांग आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समवेत आहोत. यांग यांच्यावर कुठलाही आरोप न ठेवता सुमारे सात महिने ताब्यात ठेवण्यात आले आहे. तेव्हापासून यांग यांना वकिलाची सेवा देण्यास चीनकडून नकार देण्यात आला आहे. तसेच, यांग यांच्या अटकेचे कारणही चीनकडून सांगण्यात आलेले नव्हते, असे पायने यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australian author officially arrested from China