ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणतात, कितना अच्छा है मोदी!

वृत्तसंस्था
Sunday, 30 June 2019

जी-20 परिषदेतील ठळक घडामोडी 
- पंतप्रधान मोदी आणि तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्यात गुंतवणूक, व्यापार, दहशतवाद्यांवर कारवाई या मुद्द्यांवर चर्चा. 
- मोदींची ब्राझीलचे अध्यक्ष जेअर बाल्सोनारो यांच्याबरोबरही द्विपक्षीय चर्चा. 
- जी-20 परिषद आटोपून मोदी मायदेशात. 

ओसाका : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीची जी-20 परिषदेत चांगलीच चर्चा रंगली. मॉरिसन यांनी मोदींबरोबर सेल्फी काढत तो ट्‌विटरवरही प्रसिद्ध केला आणि "कितना अच्छा है मोदी' असे कौतुक हिंदीतून केले. 

भारत-ऑस्ट्रेलिया संबंध सुधारण्यासाठी मॉरिसन दाखवीत असलेल्या उत्साहाने आनंदी झाल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी या वेळी दिली. मोदी आणि मॉरिसन यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली. 

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी जी-20 देशांनी जागतिक पातळीवर एकत्र यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 परिषदेत केले. या परिषदेसाठी मोदी जपानला गेले होते. या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नैसर्गिक आपत्तीबाबत संवेदनक्षम असणाऱ्या आणि त्याला खंबीरपणे तोंड देऊ शकणाऱ्या भविष्याच्या निर्मितीवर भर दिला. "नैसर्गिक आपत्तीमध्येही तग धरणारी यंत्रणा ही केवळ विकासासाठी आवश्‍यक नसून, नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठीही उपयुक्त आहे. अशा संकटांवर वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असते. कारण, अशा आपत्तींचा सर्वाधिक फटका गरिबांनाच बसतो. म्हणूनच, या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय आघाडी उभारण्यावर माझा भर आहे. जी-20 देशांनीही यामध्ये सामील व्हावे आणि त्यांच्याकडील ज्ञानाचा जगाला फायदा करून द्यावा,' असे आवाहन मोदींनी या वेळी केले. 

जी-20 परिषदेतील ठळक घडामोडी 
- पंतप्रधान मोदी आणि तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्यात गुंतवणूक, व्यापार, दहशतवाद्यांवर कारवाई या मुद्द्यांवर चर्चा. 
- मोदींची ब्राझीलचे अध्यक्ष जेअर बाल्सोनारो यांच्याबरोबरही द्विपक्षीय चर्चा. 
- जी-20 परिषद आटोपून मोदी मायदेशात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australian PM tweets selfie with Narendra Modi says Kithana acha he Modi