पुतिन यांच्या मध्यस्थीला कचऱ्याची टोपली; अर्मेनिया-अझरबैजान युद्ध पुन्हा सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 October 2020

शस्त्रसंधी कराराला दोन्ही देशांनी काही तासांतच कचऱ्याची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे

बाकू- भूभागावरील वर्चस्वावरून अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील वाद मिटविण्यासाठी रशियाच्या मध्यस्थीने झालेली शस्त्रसंधी दोन्ही देशांनी मान्य केली असली तरी या शस्त्रसंधीनंतर काही वेळातच त्यांनी एकमेकांवर शस्त्रसंधीचा भंग केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या शस्त्रसंधी कराराला दोन्ही देशांनी काही तासांतच कचऱ्याची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.

हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

नागोर्नो-करबाख या भागावरून अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये जवळपास २५ वर्षांपासून सुरु असलेला वाद गेल्या काही दिवसांत पुन्हा उफाळून आला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. हा वाद मिटविण्यासाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांनी दहा तास चर्चा करून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार काल (ता. १०) घडवून आणला होता. या कराराचा आधार घेत दोन्ही देश वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, करारावरील शाई वाळण्याच्या आतच अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधींचा भंग केल्याचा एकमेकांवर आरोप केला. अझरबैजानने केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात एक नागरिक मारला गेल्याचा आरोप अर्मेनियाने केला, तर अर्मेनियाने क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा अझरबैजानने केला आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी मध्यस्थी केल्यानंतर आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात शनिवारपासून युद्धबंदी होणार होती. मात्र, रविवारी अझरबैजानने आरोप केलाय की, आर्मेनियाने शनिवारी रात्री त्यांच्या शहरांवर हल्ला केला आहे. उभय देशांमध्ये सीमेवरील नागोर्नो-काराबाख क्षेत्रावरुन गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. 

चीनला मोठा झटका; डिल मोडून यूरोपीय देशाचा अमेरिकेसोबत आण्विक करार

अझरबैजानच्या अधिकाऱ्यांनी दावा केलाय की, आर्मेनिया लष्कराने देशातील दुसरे मोठे शहर गांजावर मिसाईल हल्ला केला आहे. ज्यात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. याशिवाय एक इमारत पडली आहे. मिंगाशेविर शहरातही रविवारी मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. दुसरीकडे नागोर्नो-कारबाख सैन्य अधिकाऱ्यांनी गांजा शहरावर हल्ला करण्याची बातमी फेटाळून लावली आहे. आर्मेनिया शस्त्रसंधीचे पालन करत आहे. पण, अझरबैजानने संघर्ष सुरु ठेवला आहे. सैन्याने राजधानी स्टेपनाकर्ट आणि इतर भागात गोळीबार केल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. 

रशियाने अर्मेनियासोबत सुरक्षा करार केला होता, अझरबैजानशी देखील त्याचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील संघर्षाला २७ सप्टेंबर रोजी सुरवात झाली होती. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांनी केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: azerbaijan and armeniya fresh clashes after ceasefire declaration