डेल्टापेक्षा अधिक भयानक आहे B.1.1529 व्हेरिएंट; जाणून घ्या का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delta Plus

डेल्टापेक्षा अधिक भयानक आहे B.1.1529 व्हेरिएंट; जाणून घ्या का?

नवी दिल्ली : दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट समोर आला आहे. नव्या प्रकारच्या व्हेरिएंटमुळे कोरोना संसर्गामध्ये झपाट्याने वाढ होण्याची भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नव्या प्रकारच्या व्हेरिएंटवर सध्याची लस अप्रभावी ठरू शकते. याशिवाय रूग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसून येऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला डेल्टापेक्षाही कोरोनाचा B.1.1529 व्हेरिएंट भयानक का असू शकतो याबाबतच्या 10 गोष्टी सांगणार आहोत.

1. कोरोनाच्या B.1.1.1.529 प्रकारात एकूण 50 प्रकारचे म्यूटेशन आहेत. यापैकी 30 प्रकारचे म्यूटेशन केवळ स्पाइक प्रोटीनमध्ये आहेत. स्पाइक प्रोटीन हे बहुतेक COVID-19 लसींचे लक्ष्य आहे आणि हे विषाणूला आपल्या शरिरात प्रवेश करण्यापासून रोखण्याचे काम करते. दरम्यान, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपेक्षा अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक आहे का? यावर शोध घेण्याचे काम संशोधक करत आहेत.

2. डेल्टा प्रकाराच्या तुलनेत, नवीन प्रकाराच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनमध्ये 10 प्रकारचे म्यूटेशन आढळून आले आहेत. तर यापू्र्वी आढळलेल्या डेल्टामध्ये केवळ दोन प्रकारचे म्यूटेशन आढळून आले होते. विषाणूमध्ये म्यूटेशन होणे म्हणजे विषाणूच्या अनुवांशिकतेमध्ये बदल होणे होय.

3. डेल्टा प्लस प्रकार जे नंतरच्या व्हेरिएंटमधून म्यूटेट झाले ते स्पाइक प्रोटीनवर K417N म्यूटेटवर आधारित होते. या म्यूटेशचा परिणाम शरिरातील रोग प्रतिकार क्षमतेवर झाला होता. परंतु, अद्यापपर्यंत B.1.1.1.529 व्हेरिएंटमध्ये असे होत आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

4. कोरोना विषाणूचा जसजसा संसर्ग पसरतो तसतसे त्याचे स्वरूप बदलत राहते आणि यामुळे त्याचे नवनवीन रूप समोर येतात, त्यापैकी काही अत्यंत घातक असतात. परंतु काहीवेळा ते स्वतःहून नष्ट होतात. दरम्यान, अधिक घातक आणि संक्रमित असणाऱ्या विषाणूच्या संभाव्य रुपांवर शास्त्रज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत.

5. नवीन प्रकाराच्या म्यूटेशनबद्दल अनेक अनुमान लावण्यात येत असून, नव्याने विकसित झालेला विषाणू एकाच रूग्णापासून विकसित झालेला असल्याचे बोलले जात आहे. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तीच्या दीर्घकालीन संसर्गामुळे,म्हणजेच जी व्यक्ती एचआयव्ही/एड्सने ग्रस्त आहे अशा रुग्णापासून हा नवा विषाणू आलेला असू शकतो अशी शक्यता लंडनस्थित UCL जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक फ्रांकोइस बॅलॉक्स यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भारतात नोंद नाही : सूत्र

6. कोरोनाच्या नवीन प्रकारच्या विषाणूची सर्वप्रथम ओळख दक्षिण आफ्रिकेत झाली. यानंतर हा विषाणू बोत्सवानासह शेजारच्या देशांमध्ये पसरण्यास सुरुवात झाली. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या नागरिकांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे तेदेखील यामुळे संक्रमित झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत या प्रकाराची 100 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली असून बोत्सवानामध्ये संक्रमित होणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे.

7. हाँगकाँगमध्येदेखील या प्रकाराची दोन प्रकरणे आढळून आली असून, दक्षिण आफ्रिकेतील काही प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. दरम्यान, या सर्व नागरिकांच्या घेतलेल्या नमुन्यांमध्ये अधिक जास्त विषाणू असल्याचे एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. एरिक फीगल-डिंग यांनी सांगितले.

8. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे मूल्यांकन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक कार्यगटातर्फे शुक्रवारी बैठक बोलविली आहे. यामध्ये या विषाणूला ग्रीक वर्णमालेतील नाव द्यायचे की नाही हे निश्चित केले जाऊ शकते.

9. या सर्व घडामोडींनतर ब्रिटीश सरकारने शुक्रवारी दुपारी 12 वाजल्यापासून दक्षिण अफ्रिकेतील सहा देशांतील विमान उड्डणांवर बंदी घातली आहे. तसेच जर कुणी नागरिक या देशातून परतले असतील त्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

10. भारतानेदेखील गुरुवारी दक्षिण आफ्रिकन देशातून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अलीकडेच शिथिल करण्यात आलेले व्हिसा निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी शिथिल केलेले नियमांमुळे तसेच होणारा निष्काळजीपणा गंभीर परिस्थीती निर्माण करू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.

loading image
go to top