बॉम्बस्फोटांनी बँकॉक हादरले!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

उत्तर बँकॉकमधील चांगवताना या शासकीय इमारतीजवळ अनेक लोक व्हिसा अर्ज दाखल करण्यासाठी येत असतात. या परिसरात एक बॉम्ब फुटला होता. स्फोटात काँक्रीटच्या भिंतीचा काही भाग खराब झाला असून ज्या ठिकाणी स्फोट झाला आहे त्या जागेवरून अजूनही धूर निघत आहे.

बँकॉक : थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकमध्ये आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेत चार लोक जखमी झाले आहेत. सकाळी साडे आठच्या सुमारास बीटीएस चाँग नॉन्सी स्टेशन परिसरासह इतर ठिकाणी सहा लहान बॉम्ब फुटले. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मात्र, यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, अशी माहिती मिळत आहे.

काल रात्री पोलिस मुख्यालयाबाहेर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, बॉल बीयरिंग्ज आणि ग्रीन फ्लॅशिंग लाईटच्या सामानाने भरलेल्या पॅकेटचा आज सकाळी स्फोट झाला. ही सर्व साधने घरी (होममेड) बनविण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काल सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक इसम रॉयल थाई पोलिस मुख्यालयाबाहेर सामानाने भरलेले पॅकेट ठेवताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. 

उत्तर बँकॉकमधील चांगवताना या शासकीय इमारतीजवळ अनेक लोक व्हिसा अर्ज दाखल करण्यासाठी येत असतात. या परिसरात एक बॉम्ब फुटला होता. स्फोटात काँक्रीटच्या भिंतीचा काही भाग खराब झाला असून ज्या ठिकाणी स्फोट झाला आहे त्या जागेवरून अजूनही धूर निघत आहे. या स्फोटांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी वाहतूक यंत्रणा तात्पुरती बंद केली. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा यांनी हल्ल्यांचा निषेध करताना म्हटले आहे की, "शांतता नष्ट करू पाहणारे आणि देशाची प्रतिमा खराब करणारेच अशा परिस्थितीला कारणीभूत आहेत." 

(व्हिडीओ सौजन्य : मिरर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangkok rocked with multiple blasts