
''अमित शहांचे ज्ञान मर्यादित''; बांगलादेशच्या मंत्र्याची बोचरी टीका
ढाका- पश्चिम बंगालचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मोमिन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. मोमिन म्हणाले की, बांगलादेशबाबत अमित शहा यांचे ज्ञान मर्यादित आहे. त्यांनी असंही म्हटलं की, भारत आणि बांगलादेशचे संबंध मजबूत आहेत, पण भारतीय गृहमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य पूर्णपणे अस्वीकार्य आहे. अशा प्रकारचे वक्तव्य गैरसमज निर्माण करतात. दरम्यान, अमित शहा म्हणाले होते की, बांगलादेशच्या लोकांना त्यांच्या इथे खाण्यास पुरेसं जेवण मिळत नाही, त्यामुळेच ते भारतामध्ये येत असतात.
शाह यांचे ज्ञान मर्यादित
शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मोमिन म्हणाले की, जगभरात खूप सारे ज्ञानी लोक आहेत. पण, ते माहिती असूनही समजत नसल्याचं ढोंग घेतात. अमित शहांनी असं म्हटलं असेल तर त्यांचे बांगलादेशसंबंधी ज्ञान मर्यादित आहे. बांगलादेशमध्ये भूकेमुळे कोणीही मरत नाही. अनेक मुद्द्यांमध्ये बांगलादेश भारतापेक्षा पुढे आहे.
एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शहा म्हणाले होते की, बांगलादेशमध्ये लोकांना पुरेसं खायला मिळत नाही. त्यामुळे ते भारतात येतात. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला, तर घुसखोरीवर आम्ही लगाम लावू. यावर प्रत्युत्तर देताना मोमिन म्हणाले की, त्यांच्या देशातील 50 टक्के लोक शौचालयाचा वापर करतात, तर भारतातील फक्त 50 टक्के लोकच शौचालयाचा वापर करतात.
हेही वाचा: बंगालला बांगलादेश करण्याचा कट; नंदीग्राममध्ये सुवेंदुंवर हल्ल्यानंतर भाजपची प्रतिक्रिया
बांगलादेशात काम करतात अनेक भारतीय!
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, बांगलादेशमध्ये शिक्षित लोकांना नोकरीची कमी आहे, पण शिक्षित लोक मोठ्य़ा प्रमाणात आहेत. बांगलादेशमध्ये अनेक भारतीय लोक राहतात. आम्हाला भारतात जायची गरज नाही. दरम्यान, भारतातील पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. यावेळी घुसखोरी हा राजकीय मुद्दा बनला आहे. भाजपच्या नेत्यांनी सत्ता आल्यास घुसखोरी रोखण्यासाठी पावलं उचलण्यात येतील, असं म्हटलं आहे.
Web Title: Bangladesh Minister Abdul Momin Criticize Bjp Leader Amit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..