बांगलादेशात शेख हसिना यांच्या आघाडीला 300 पैकी 288 जागा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

बांगलादेशात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विद्यमान पंतप्रधान शेख हसिना यांच्या सत्ताधारी आघाडीने 288 जागा खिशात घालत दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयामुळे चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचा शेख हसिना यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने मिळविलेला विजय हा हास्यास्पद असून, पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

ढाका- बांगलादेशात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विद्यमान पंतप्रधान शेख हसिना यांच्या सत्ताधारी आघाडीने 288 जागा खिशात घालत दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयामुळे चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचा शेख हसिना यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने मिळविलेला विजय हा हास्यास्पद असून, पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

सत्ताधारी अवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीने बांगलादेश संसदेच्या तीनशेपैकी 288 जागांवर विजय प्राप्त केला असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे सचिव हेलालुद्दीन अहमद यांनी आज दिली. एकूण मतदानापैकी सुमारे 82 टक्के मते अवामी लीग आघाडीला मिळाली आहेत. या पक्षाने 2008मध्ये 263 जागांवर विजय संपादन केला होता. विरोधातील नॅशनल युनिटी फ्रंटला (एनयूएफ) फक्त 15 टक्के मते मिळाली असून, त्यांना सात जागांवर विजय मिळाला आहे. तर, इतर पक्षाला तीन जागांवर यश मिळाले आहे, असे अहमद यांनी स्पष्ट केले. एका मतदारसंघामध्ये मतदान पुढे ढकलण्यात आले असून, दुसऱ्या एका मतदारसंघात उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे निकाल घोषित करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

विजय हास्यास्पद ः विरोधक 
भ्रष्टाचाराच्या खटल्यात शिक्षा भोगत असलेल्या 72 वर्षीय खालेदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीला (बीएनपी) मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. निवडणुकीतील हा विजय हास्यास्पद असून, तटस्थ काळजीवाहू सरकार स्थापन करून पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी विरोधातील एनयूएफ आघाडीकडून करण्यात आली आहे. या निवडणुकीत जवळजवळ सर्वच केंद्रांवर गैरव्यवहार झाले आहेत. त्यामुळे हा निकाल आम्हाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया एनयूएफचे प्रमुख कमाल होसैन यांनी व्यक्त केली. शेख हसिना यांच्या सरकारच्या काळात मुक्त वातावरणात निवडणुका होणे अशक्‍य असल्याचा आरोप बीएनपीचे सरचिटणीस मिर्झा फख्रूल इस्लाम अलमगीर यांनी केला आहे. 

शेख हसिना चौथ्यांदा सत्तेवर 
अवामी लीगच्या नेत्या 71 वर्षीय शेख हसिना यांनी आत्तापर्यंत तीन वेळा बांगलादेशचे पंतप्रधान पद भूषविले आहे. त्यामुळे या निवडणुकीतील विजयामुळे त्यांचा चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा मानही हसिना यांच्या नावावर जमा होणार आहे. हसिना या बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजिबूर रहमान यांच्या कन्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladesh ruling coalition declared winner of disputed vote