सावधान! गुगलचे कर्मचारी ऐकतायत तुमच्या खाजगी गोष्टी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

गुगल असिस्टंटच्या मदतीने घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळणे यासारखी कामेही करता येतात. गुगल सर्व व्हॉईस कमांड एका सर्व्हरद्वारे रेकॉर्ड करत असल्यामुळे युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

नवी दिल्ली : गुगलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे, अशी  माहिती समोर आली आहे. गुगल कंपनीचे कर्मचारी हे युजर्सच्या सर्व गोष्टी ऐकत असून युजर्सचे वैयक्तिक संवाद रेकॉर्ड केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. गुगल हे जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे. एका क्षणात हव्या त्या क्षेत्राशी संबंधित माहिती आपल्याला गुगलवर मिळते. 

गुगल होम स्मार्ट स्पीकर ही सेवा पुरविणारे गुगलचे कर्मचारी युजर्सच्या फोनमधील वैयक्तिक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकतात, हे गुगलने देखील मान्य केले आहे. ट्रान्स्क्राईब सेवा पुरविणारे गुगलचे स्मार्ट स्पीकर विविध स्थानिक भाषांमधील युजर्सचे बोलणे रेकॉर्ड करतात. त्याचे अर्थ लावून त्यानुसार गुगलच्या फीचर्समध्ये सुधारणा करण्यासाठी हे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकलं जात असल्याची माहिती गुगलने दिली आहे.  

गुगल असिस्टंटच्या मदतीने घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळणे यासारखी कामेही करता येतात. गुगल सर्व व्हॉईस कमांड एका सर्व्हरद्वारे रेकॉर्ड करत असल्यामुळे युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गुगलने स्टोअर करून ठेवलेले सर्व रेकॉर्डींग हे युजर्स पुन्हा ऐकतील अशी सोयही गुगलने उपलब्ध केली आहे. 

युजर्स दिवसभरात कोठे जातात, काय वाचतात, कोणती गाणी ऐकतात याबाबतची माहिती गुगलकडे असते. तसेच गुगल मॅप्सच्या मदतीने युजर्सचे लोकेशन ट्रॅक केले जाते. तो जीपीएस आपल्या आयपी अ‍ॅड्रेसबरोबर कॉर्डिनेट करतो. गुगल आपल्याला ट्रॅक करण्यासाठी सेल टॉवर्स आणि वाय-फाय एक्सेस पॉईंटचाही वापर करू शकते. गुगल युजर्सच्या सर्च हिस्ट्रीची नोंददेखील ठेवते. युजर्सच्या आवडीनुसार त्यांना माहिती उपलब्ध करून देतात. गुगल युजर्सचे ई-मेल स्कॅन करतात. त्यानुसार त्या ई-मेलच्या आधारावर जाहिराती पाठवतात. स्मार्टफोनमध्ये थर्ड पार्टी अ‍ॅप युजर्स वापरत असतील, तर त्याची देखील माहिती गुगलकडे असते.

युजर्सच्या ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्सही गुगलकडे असतात. शॉपिंगच्या बिलची रिसीट आपल्या जी-मेल अकाऊंटवर पाठवून गुगलला याबाबतची माहिती युजर्सचं देत असतात. एका खाजगी वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, युजर्स किती पैसे खर्च करतात याची माहिती गुगलला एका प्रायवेट वेब टूलच्या मदतीने मिळते. मात्र, कंपनीने 2017 मध्ये जी-मेल मेसेजमधून डेटा एकत्र करून त्याचा जाहिरातीसाठी वापर करणे बंद केल्याचे कंपनीने सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful Google employees are listening your private talks