बिल गेट्स यांनी सांगितलं, कधी मिळणार लस आणि संपणार कोरोना?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

गेट्स म्हणाले की, फक्त श्रीमंत देशांमधूनच नाही तर गरीब देशांमधूनही कोरोना नष्ट व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे.

वॉशिंग्टन - जगभर सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी अनेक देशांमध्ये लस शोधण्याचं काम सुरू आहे. लस कधी तयार होणार याकडे जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. आता काही वॅक्सिनची मानवी चाचणीही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे. यामध्ये ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही कोरोना वॅक्सिनबाबत माहिती दिली आहे. 

बिल गेट्स म्हणाले की, कोरोना वॅक्सिन पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होईल. तसंच हे वॅक्सिन पहिल्यांदा श्रीमंत देशांना मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय हे वॅक्सिन कोरोनाविरुद्ध प्रभावी ठरेल की नाही याबद्दलही शंका आहे. सुरुवातीला वॅक्सिन जास्त प्रभावी ठरण्याची शक्यता कमी आहे. याचा प्रभाव दिसण्यास वेळ लागू शकतो. अमेरिकेला या प्रकरणी जागतिक परिस्थितीचा विचार करावा लागेत. जगाचं हितही त्यांनी बघायला हवं. 

हे वाचा - BIG NEWS : कोरोनावरील दोन मोठ्या कंपन्यांच्या गोळ्या बाजारात, किंमत केवळ ३५ रुपये

अमेरिकेच्या खासदरांना बिल गेट्स यांनी आवाहन केलं आहे की, त्यांनी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना कोरोना वॅक्सिन खरेदी करण्यासाठी 8 अब्ज डॉलर द्यावं. गेट्स म्हणाले की, फक्त श्रीमंत देशांमधूनच नाही तर गरीब देशांमधूनही कोरोना नष्ट व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. बिल गेट्स यांची संस्था बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने कोरोनाशी संबंधित संशोधनासाठी 25 कोटी डॉलरची मदत दिली आहे. एवढंच नाही तर गेट्स एस्ट्राजेनेका, जॉनसन अँड जॉनसन आणि नोवावॅक्स तयार करत असलेल्या कोरोना लसासाठी अर्थसहाय्य करत आहेत. 

हे वाचा - Covid19 साठीच्या औषधांचा मोठा काळाबाजार, समोर आलं ब्लॅक मार्केटिंगचं दिल्ली कनेक्शन

गेट्स यांनी सांगितलं की, कोरोना वॅक्सिनशिवाय रुग्णांच्या उपचारांसाठी औषधे तयार केली जात आहेत. त्यामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. कोरोना व्हायरसच्या चाचणीमध्ये उपचारांचा शोध आणि वॅक्सिनसाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत जगात 2021 अखेरपर्यंत कोरोनाची साथ नष्ट होईल अशी आशा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bill gates talk about corona pandemic and vaccine