
Brazil News : बोल्सोनारोंच्या शेकडो समर्थकांकडून धुडगूस
ब्राझिलिया : अमेरिकेत दोन वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवानंतर कॅपिटॉल हिलवर झालेल्या हल्ल्याचीच पुनरावृत्ती आज ब्राझीलमध्ये पहायला मिळाली.
माजी अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांचा निवडणुकीत झालेला पराभव अमान्य करत त्यांच्या हजारो समर्थकांनी आज येथील संसद, सर्वोच्च न्यायालय आणि अध्यक्षीय निवासस्थानात घुसून धुडगूस घातला. समर्थकांनी इमारतींमध्ये तोडफोड केली.
पोलिसांनी कठोर कारवाई करत चारशे जणांना अटक केली असून या घटनेचा उच्चस्तरीय तपास सुरु केला आहे.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव अमान्य करत समर्थकांना चिथावणी दिल्यानेच सहा जानेवारी २०२१ या दिवशी कॅपिटॉल हिल या अमेरिकेच्या सिनेटचे सभागृह असलेल्या इमारतीवर हल्ला झाला होता.
या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु आहे. तसाच प्रकार आज ब्राझीलमध्ये घडला. गेल्या वर्षी अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत तेव्हाचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांचा डाव्या विचारसरणीचे नेते लुईझ इन्शिओ लुला दा सिल्वा यांनी पराभव केला होता. बोल्सोनारो यांनी अद्यापही जाहीरपणे हा पराभव मान्य केलेला नाही.
गेल्याच आठवड्यात लुला यांनी अध्यक्षपदाची शपथ घेत कामकाजाची सूत्रेही हाती घेतली होती. मात्र, रविवारी अचानक बोल्सोनारो यांच्या हजारो समर्थकांनी संसद, सर्वोच्च न्यायालय आणि अध्यक्षीय निवासस्थान या सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये घुसखोरी करत तोडफोड केली.
लोकशाही परंपराचा आदर व्हावा : मोदी
नवी दिल्ली : ब्राझीलमध्ये माजी अध्यक्ष जैर बोलसोनारो यांच्या समर्थकांनी दंगल घडविल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून चिंता व्यक्त केली आहे. ‘ब्राझीलमध्ये दंगल, तोडफोड करण्याच्या बातम्यांमुळे खूप चिंतित आहे. प्रत्येकाकडून लोकशाही परंपरांचे पालन व्हायलाच हवे. आम्ही ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण पाठिंबा देतो’, असे ट्विट मोदी यांनी केले आहे.
पोलिसांनाही मारहाण
सुटी असल्याने हल्ला झालेल्या तिन्ही सरकारी इमारतींमध्ये सुरक्षा रक्षकांशिवाय फारसे कोणी नव्हते. देशाचे झेंडे हातात घेतलेल्या बोल्सोनारो समर्थकांनी या इमारतींभोवतीचे सुरक्षा कडे मोडून घुसखोरी केली. त्यांना अडविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरु करताच काही समर्थकांनी पोलिसांनाही मारहाण केली.
यात काही पोलिस जखमी झाले. काही जणांनी इमारतींच्या काचा फोडल्या, कुंड्यांची नासधूस केली. अनेक जण छतावरही चढले होते. समर्थकांनी इमारतींच्या आतील भागांतील भींती मजकूराने रंगविल्या. अध्यक्षीय इमारतींमधील कार्यालयांची नासधूस केली.
पोलिसांवरही संशय
बोल्सोनारो समर्थकांकडून गोंधळ माजविला जाण्याचा इशारा वारंवार दिला जाऊनही पोलिसांनी पुरेशी काळजी न घेतल्यानेच संसद आणि इतर सरकारी इमारतींमध्ये घुसखोरी झाली, असा आरोप सोशल मीडियावरून होत आहे.
समर्थकांना रोखण्यात पोलिसांनी पूर्ण क्षमता पणाला लावली नाही, उलट काही ठिकाणी मदतच केल्याचे दिसून आले असल्याचाही आरोप झाला आहे. या आरोपांची शाहनिशा करून संबंधित पोलिसांची हकालपट्टी केली जाईल, असे आश्वासनही अध्यक्ष लुला यांनी दिले आहे.
‘बोल्सोनारो यांनीच दिली चिथावणी’
ब्राझीलचे अध्यक्ष लुला यांनी साओ पावलो येथे पत्रकार परिषद घेत या हल्ल्यावर जोरदार टीका केली आहे. जेर बोल्सोनारो यांनीच चिथावणी दिल्याने हा प्रकार घडल्याचाही आरोप त्यांनी केला.
ब्राझिलिया शहराची सुरक्षा केंद्रीय सुरक्षा यंत्रणेकडे देण्याचे आदेश जारी करतानाच लुला यांनी, दोषींना शासन करण्याचा निर्धार व्यक्त केला. एका कार्यक्रमासाठी अमेरिकेला गेलेल्या बोल्सोनारो यांनी मात्र लुला यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.
नियंत्रण मिळविले
लष्कराने हस्तक्षेप करत बोल्सोनारो यांच्या हाती पुन्हा सत्ता द्यावी किंवा किमान लुला यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी हे समर्थक करत होते.
समर्थकांना रोखण्यासाठी आणि इमारतींमधून हुसकावून लावण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी चारशेहून अधिक समर्थकांना अटक करत तिन्ही इमारतींवर ताबा मिळविला.