कॅनडातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये बॉंबस्फोट

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

कॅनडातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये झालेल्या बॉंबस्फोटानंतर भारत सरकार कॅनडातील भारतीय उच्चायुक्त व टोरांटोमधील वाणिज्य प्रतिनिधींशी सतत संपर्कात आहे. पीडितांच्या मदतीसाठी आम्ही 24 तास उपलब्ध असून, त्यांना सर्व प्रकारची मदत देईल.
- सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री

15 नागरिक जखमी; संशयित हल्लेखोरांची छायाचित्र प्रसिद्ध

टोरांटो: कॅनडातील ओंटारियो प्रांतातील मिसिसौगा येथे "बॉम्बे भेळ' या भारतीय रेस्टॉरंटमध्ये बॉंबस्फोट होऊन 15 लोक जखमी झाले. हा स्फोट स्थानिक वेळेनुसार गुरुवारी (ता. 24) रात्री साडेदहाच्या दरम्यान झाला, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. रेस्टॉरंटमध्ये त्या वेळी किती लोक होते हे समजू शकले नाही.

रेस्टॉरंटमध्ये काल रात्री दोन जण आले. त्यांच्याकडील स्फोटकांद्वारे त्यांनी हा स्फोट घडवून आणला. यात 15 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कॅनडातील "सीबीसी' या प्रसारमाध्यमाने दिली. या स्फोटानंतर दोन्ही संशयित हल्लेखोर पळून गेले. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणी घेतली नसून, त्या मागील कारणही समजू शकले नाही, असे ट्विट "पील रिजनल पॅरॅमेडिक सर्व्हिसेस'ने केले आहे. प्रशासनाने घटनास्थळी बॉंबशोधक पथक पाठविले आहे.

संशयित हल्लेखोरांपैकी एक जण 20 वर्षांच्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते दोघे हातात काही तरी वस्तू घेऊन रेस्टॉरंटमध्ये जात असल्याचे सीसीटीव्हीत दिसले असून, त्यांची छायाचित्रे पोलिसांनी ट्विटरवर शेअर केली आहेत. या भागातील सर्व रस्ते बंद करण्यात आले असून, तेथे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवलेला आहे. शीघ्र कृती दलाच्या सशस्त्र अधिकाऱ्यांनी या भागाला गराडा घातला आहे.

कॅनडातील सहावे मोठे शहर
मिसिसौंगा हे कॅनडातील सहावे मोठे शहर आहे. याची लोकसंख्या सात लाख आहे. टोरांटोच्या पश्‍चिमेला 28 किलोमीटरवर ओंटारियो सरोवराच्या काठी हे शहर वसलेले आहे. मिसिसौंगातील मुख्य भागात "बॉम्बे भेळ' हे भारतीय साखळी रेस्टॉरंट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bomb blast in Indian restaurant in Canada