मी भारताचा जावई म्हणणारे बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

- हुजूर पक्षाच्या प्रमुखपदी निवड
- जेरेमी हंट यांचा पराभव 

 

लंडन ः हुजूर पक्षाच्या प्रमुखपदाच्या शर्यतीत जेरेमी हंट यांना मागे टाकत बोरिस जॉन्सन यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे जॉन्सन हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील, यावर आज शिक्कामोर्तब झाले. ब्रिटनचे माजी परराष्ट्रमंत्री आणि लंडनचे माजी महापौर असलेले जॉन्सन हे बुधवारी (ता. 23) पंतप्रधानपदाची शपथ घेतील. जॉन्सन आणि हंट यांच्यातील शर्यतीत सुरवातीपासून जॉन्सन यांचे पारडे जड मानले जात होते.

ब्रिटनची एकजूट करीत ब्रेक्‍झिटची प्रक्रिया पूर्ण करणारच आणि त्याच वेळी जेरेमी कॉर्बीन यांचा पराभवही करू, असे आश्वासन जॉन्सन यांनी हुजूर पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिले आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जॉन्सन यांना 92 हजार 153 मते मिळाली, तर हंट यांना 46 हजार 656 मतांवर समाधान मानावे लागले. पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जॉन्सन हे आता थेरेसा मे यांची जागा घेणार आहेत. मे यांनी मांडलेल्या ब्रेक्‍झिटच्या मसुद्यावर एकमत होऊ न शकल्यामुळे त्यांना पंतप्रधानपदासह हुजूर पक्षाच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. ब्रेक्‍झिटचे घोडे अडल्यामुळे मे यांनी यापूर्वीच राजीनाम्याची घोषणा केली होती. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्या कामकाज पाहत होत्या. जॉन्सन यांना आपला संपूर्ण पाठिंबा असेल, असे सांगत मे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

"ब्रेक्‍झिटची प्रक्रिया 31 ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या नव्या संधींचा ब्रिटनच्या भल्यासाठी वापर करून घेतला जाईल. स्वतःबद्दलच्या शंका आणि नकारात्मकता मागे सोडत ब्रिटनला नव्या उंचीवर घेऊन जाऊ,'' अशी प्रतिक्रिया जॉन्सन यांनी निकालानंतर व्यक्त केली. 

मी भारताचा जावई! 
आपण भारताचे जावई आहोत, असे जॉन्सन यांनी एकदा म्हटले होते. जॉन्सन यांच्यापासून विभक्त झालेल्या त्यांच्या पत्नी मरिना व्हिलर यांची आई भारतीय नागरिक होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही जॉन्सन यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारत आणि ब्रिटनमधील द्वीपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर आपला भर असेल, असे त्यांनी जाहीर केले होते. पंतप्रधानपदी निवड झाल्यास द्वीपक्षीय व्यापार वाढविण्यावर भर देणार असल्याचा दावा जॉन्सन यांनी केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boris Johnson Freshly elected as UKs next PM