ब्राझिलचे अध्यक्ष बोलसोनारो यांना कोरोनाची बाधा

वृत्तसंस्था
Tuesday, 7 July 2020

ब्राझिलमध्ये कोरोना महामारीने हाहाकार माजवला असताना एक धक्कादायक बातमी आली आहे. ब्राझिलच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण झाली आहे.

ब्राझिलिया- ब्राझिलमध्ये कोरोना महामारीने हाहाकार माजवला असताना एक धक्कादायक बातमी आली आहे. ब्राझिलच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण झाली आहे. जैर बोलसोनारो यांची कोविड चाचणी मंगळवारी पॉझिटिव्ह आली आहे. बोलसोनारो यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. 

मी ठिक आहे. मला आता थोडंचं इकडे तिकडे फिरावंस वाटत आहे, पण वैद्यकीय सल्लामुळे मी तसं करु शकत नाही, असं बोलसोनारो पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत. त्यांनी यावेळी मास्क घालून माध्यमांशी संवाद साधला.

राज्य सरकारमध्ये खरचं अस्वस्थता आहे का? वाचा शरद पवार यांचं उत्तर
बोलसोनारो यांना दोन दिवसांपासून साधा ताप आला होता. सोमवारी सायंकाळी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं मंगळवारी समोर आलं. बोलसोनारो यांनी कठोर टाळेबंदी लागू करण्यास नकार दिला होता. टाळेबंदीमुळे निर्माण झालेली आर्थिक समस्या कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या समस्येपेक्षा अधिक गंभीर असेल असं ते म्हणाले होते. त्यामुळे देशात टाळेबंदीबाबत थोडी शिथिलता ठेवण्यात आली होती.

ब्राझिल कोरोना महामारीमुळे बेजार झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ब्राझिलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आतापर्यंत ब्राझिलमध्ये 16 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर कोरोना विषाणूने आतापर्यंत 65 हजारांपेक्षाही अधिकांचा बळी घेतला आहे. ब्राझिल हा लोकसंख्येच्या बाबतीत जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे. देशाची लोकसंख्या  21 कोटी आहे. ब्राझिल कोरोना महामारीचं केंद्र बनला आहे.

देश कुठल्या संकटात अन् यांच्या मुलाखती! पहा निलेश राणेंचे खळबळजनक ट्विट
गेल्या आठवड्यात जैर बोलसोनारो यांनी अमेरिकी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरी केला होता. अमेरिकी राजदूतासोबतचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकले होते. तसेच त्यांच्या आजूबाजूला मंत्रीगणही दिसत होता. यावेळी कोणत्याही नेत्याने शारीरिक अंतर राखलं नव्हतं. शिवाय मास्कही लावला नव्हता. 
 
बोलसोनारो यांची याआधी तीनदा कोरोना चाचणी घेण्यात आली होती. तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. दरम्यान, देशात कोरोना महामारीने थैमान घातले असताना राष्ट्राध्यक्षांनाच कोरोनाची बाधा झाल्याने चिंता वाढली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brazil President Jair Bolsonaro tests positive for Covid-19