स्वार्थवादावर ब्रिक्‍स देशांची टीका

पीटीआय
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

डिजिटल हेल्थ परिषद भारतात
‘ब्रिक्‍स’अंतर्गत डिजीटल हेल्थ परिषद पुढील वर्षी भारतात घेणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले. जीवनशैली आरोग्यदायी बनविण्याच्या हेतूने डिजिटल तंत्रज्ञानाचा आरोग्याशी निगडित बाबींमध्ये अधिकाधिक वापर करण्याच्या हेतूने ही परिषद आयोजित केली जाणार आहे. मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘फिट इंडिया’ अभियानाशी ही परिषद पूरक असेल. मोदी यांनी पारंपरिक औषधांच्या संशोधन आणि वापरावरही भर दिला.

ब्राझीलिया - बहुस्तरीय व्यापारात निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याचा निश्‍चय करतानाच ‘ब्रिक्‍स’ देशांनी स्वार्थवादावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांचा रोख अमेरिकेच्या आयात-निर्यात धोरणांवर होता. 

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ‘ब्रिक्‍स’च्या सदस्य देशांनी आज परिषदेच्या समारोपावेळी संयुक्त ठराव जाहीर केला. ‘व्यापारातील तणाव आणि धोरणांमधील अनिश्‍चितता यामुळे व्यापार, गुंतवणूक आणि विकासाबरोबरच एकमेकांमधील विश्‍वासाचाही बळी घेतला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या सर्व सदस्यांनी एकतर्फी निर्बंध लादणे आणि स्वार्थवाद जोपासणे या गोष्टी टाळायला हव्यात. जागतिक पातळीवर व्यापार करताना तो नियमांना धरून, पारदर्शक, इतरांचे नुकसान न करणारा, मुक्त असायला हवा,’ असे या ठरावात म्हटले आहे. आपल्या मालाचा बचाव करण्यासाठी अमेरिकेचे चीनबरोबर व्यापार युद्ध सुरु असून त्यांनी अनेक देशांवर एकतर्फी निर्बंधही घातले आहेत. अकराव्या ब्रिक्‍स परिषदेचा समारोप झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brics country comment on Selfishness