5 हजार जणांच्या हत्या प्रकरणात 93 व्या वर्षी ठरवलं दोषी, न्यायालयाने दिली 2 वर्षांची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 July 2020

न्यायालयाने ब्रूनो डेला कमीत कमी 5 हजार 232 लोकांच्या हत्या प्रकरणात मदत केल्याचा आणि अपहरण केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आहे.

बर्लिन - जर्मनीतील एका न्यायलयाने गुरुवारी 93 वर्षीय व्यक्तीला हजारो नाझींच्या हत्या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. नाझींच्या हत्येमध्ये मदत केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही न्यायालयाने ठोठावली आहे. 75 वर्षांपूर्वी 1944 ते 45 च्या दरम्यान स्टथऑफ कंसेनट्रेशन कॅम्पमध्ये गार्ड म्हणून ब्रूनो डे काम करत होते. जर्मनीमध्ये नाझीच्या काळातील आरोपींना शिक्षा देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. हॅम्बर्ग राज्यातील एका न्यायालयाने ब्रूनो डेला कमीत कमी 5 हजार 232 लोकांच्या हत्या प्रकरणात मदत केल्याचा आणि अपहरण केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आहे. या सर्व लोकांची हत्या ऑगस्ट 1944 ते एप्रिल 1945 पर्यंत स्टथऑफ कसेनट्रेशन कॅम्पमध्ये झाल्याचं मानलं जातं. 

ब्रूनो डेयांना अल्पवयीनांसाठी असलेल्या न्यायलयात हजर करण्यात आलं होतं. कारण दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी ते फक्त 17 वर्षांचे होते. ब्रूनो यांना दोन वर्षांची देण्यात आलेली शिक्षा खूपच कमी आहे अशी भावना कँपमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय ऑशविट्झ समितीच्या क्रिस्टोफ हेबनर यांनी शिक्षा सुनावल्यानंतर म्हटलं की, खूपच उशिरा ही शिक्षा झाली आणि असमाधानकारक आहे.

नाझी काळातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी एक विशेष कार्यालय तयार करण्यात आलं आहे. या ठिकाणी वयोवृद्ध लोकांविरुद्ध गुन्ह्यांचे खटले चालवले जातात जे नाझींच्या काळात हिटलरचे सहकारी होते. या खटल्यातील लोकांना शिक्षा सुनावण्याचं काम इथं चालतं. ब्रूनो डेची केस यामध्ये नवी होती. 

जर्मनीतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हॅम्बर्ग राज्यातील न्यायालयात ब्रूनो डे एका व्हीलचेअरवर बसलेला होता. न्यायालयात वयोवृद्ध झालेल्या ब्रूनोने कोरोनाच्या काळात सुरक्षेसाठी मास्क घातला होता. तसंच सुनावणीवेळी त्याने मानही खाली केली होती. न्यायाधीश एनी मियर गोयरिग यांनी निर्णय देताना ब्रूनो डेला सांगितलं की, तुम्ही आताही स्वत:ला एक सुपरवायझर म्हणून बघता. मात्र प्रत्यक्षात तुम्ही या मानवनिर्मित नरकासाठी एक सहकारी होतात. 

ब्रूनो डे यांनी 9 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या ट्रायलवेळी असं सांगितलं होतं की, त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तसंच मला माहिती नव्हतं की कॅम्पमध्ये आत काय व्हायचं. पण ब्रूनोने हेसुद्धा मान्य केलं होतं की गॅस चेंबर्समध्ये बंद केलेल्या लोकांच्या किंकाळ्या ऐकल्या होत्या. तसंच बाहेर येणारे मृतदेहसुद्धा पाहिले होते. त्यानंतर कधीच सुखाची झोप आली नाही. नेहमी भीतीदायक अशी स्वप्न पडत होती असंही ब्रूनोने सांगितलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bruno dey convicted for 5230 murder in Nazi camp Germany