'चोराच्या उलट्या बोंबा' चीन म्हणते; हक्काची एक इंच जमीनही सोडणार नाही

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 5 September 2020

 पूर्व लडाख भागात चीनने केलेली घुसखोरी आणि त्यामुळे निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी शेजारील राष्ट्राच्या संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीतच त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या तोफ डागली होती.

नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगही यांच्यात शुक्रवारी रशियात दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली. या बैठकीनंतर आता चीनने एक निवेदन जारी केले आहे. लडाख सीमाभागातील तणावाला भारत जबाबदार असल्याचा आरोप या निवेदनाच्या माध्यमातून चीनकडून करण्यात आला आहे. चीन आपल्या हक्काची एक इंच जमीनही सोडणार नाही, अशा आक्रमक भाषेचा वापरही करण्यात आलाय.  

शांततेसाठी विश्‍वासाचे वातावरण आवश्‍यक; राजनाथसिंह यांचा चीनला टोला

चीनच्या निवेदनानुसार, सीमारेषेवर तणावपूर्ण वातावरण नाकारता येणार नाही. या परिस्थितीला भारत जबाबदार आहे. चीन आपली एक इंच जमीनही सोडणार नाही. आमच्या भू-भागाचे रक्षण करण्यासाठी सैन्य सक्षम आणि आश्वस्त आहे. चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग (Xi Jinping) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi) यांच्यात जी महत्त्वपूर्ण चर्चा झाली त्याची दोन्ही राष्ट्रांनी प्रामाणिकपणे विचार करायला हवा. वादग्रस्त भूखंडावरुन निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीतून तोडगा करण्यासाठी चर्चेचा मार्गाचा अंवलंब करायला हवा, असा उल्लेखही चीनने केला आहे. 

एकही लस 50 टक्केसुद्धा निकष पूर्ण करू शकली नाही; WHO ने दिली धक्कादायक माहिती

आंतरराष्ट्रीय नियमांचा आदर आणि वादावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा ही शांतता आणि सुरक्षिततेचा मंत्र आहे. विश्‍वासाचे वातावरण निर्माण करुन वाद मिटवायला हवेत, असे  संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी शांघाय सहकार्य परिषदेत म्हटले होते.  पूर्व लडाख भागात चीनने केलेली घुसखोरी आणि त्यामुळे निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी शेजारील राष्ट्राच्या संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीतच त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या तोफ डागली होती. मागील चार महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील चिनी सैन्याच्या घुसखोरीवरून वाद निर्माण झाला आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही चीनच्या आडमुठेपणामुळे तणाव कायम आहे. चीनने याच आठवड्यात तीन वेळेस घुसखोरीचा प्रयत्नही केला होता, तो भारताने उधळून लावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cant Lose An Inch Of Territory China says After Rajnath Singh Meet