कोरोना झालेल्या ब्राझिलच्या राष्ट्रपतींविरोधात गुन्हा दाखल होणार

कार्तिक पुजारी
बुधवार, 8 जुलै 2020

मंगळवारी ब्राझिलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. बोलसोनारो यांनी स्वत: पत्रकारांसमोर येत ही माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर ब्राझिलच्या मीडिया संघटनेने राष्ट्रपतींच्या विरोधात खटला दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे

नवी दिल्ली- मंगळवारी ब्राझिलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. बोलसोनारो यांनी स्वत: पत्रकारांसमोर येत ही माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर ब्राझिलच्या मीडिया संघटनेने राष्ट्रपतींच्या विरोधात खटला दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. बोलसोनारो यांनी जाणूनबुजून पत्रकारांचा जीव धोक्यात घातला आहे, असा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. 

आमच्या कामात ढवळाढवळ करु नका; रशियाने अमेरिकेला सुनावलं
मंगळवारी बोलसोनारो यांनी पत्रकारांसमोर येत आपल्याला कोरोना झाल्याचं जाहीर केलं. त्यांना कोरोनाची लागण झाली असताना त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधायला नको होता. बोलसोनारो हे अपराधी आहेत, त्यांनी पत्रकारांचा जीव धोक्यात घातला. तसेच डॉक्टरांनी विलगीकरणात राहण्याचा दिलेला सल्ला धुडकावून लावून त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली, असा आरोप  मीडिया संघटनेने  केला आहे. त्यांमुळे त्यांच्याविरोधात न्यायालयीन खटला दाखल करणार असल्याचं संघटनेने म्हटलं आहे.

राष्ट्रपतींनी गुन्हा संहितेच्या कलम 131 चे उल्लंघन केले असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या कलमानुसार दुसऱ्यांना गंभीर आजार पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जातो. याअंतर्गत दंड आणि तुरुंगवास  अशा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. 

मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, बोलसोनारो यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पांढऱ्या रंगाचा एक सामान्य मास्क घातला होता. त्यांनी पत्रकारांना सांगितलं की, मला गंभीर लक्षण नाहीत. त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रपतींनी पत्रकारांना थोडंसं दूर व्हायला सांगितलं आणि तोंडावरचा मास्क काढला. त्यानंतर बोलसोनारो म्हणाले की माझ्या चेहऱ्याकडे पाहा ईश्वराच्या कृपेने मी ठिक आहे. यानंतर त्यांनी पुन्हा मास्क घातला. बोलसोनारो यांनी संक्रमित असताना केलेल्या या कृतीमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

कोरोनावर आणखी एक औषध लवकरच; प्रसिद्ध फार्मा कंपनीने केली घोषणा
दरम्यान, ब्राझिल कोरोना महामारीमुळे बेजार झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ब्राझिलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आतापर्यंत ब्राझिलमध्ये 16 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर कोरोना विषाणूने आतापर्यंत 65 हजारांपेक्षाही अधिकांचा बळी घेतला आहे. ब्राझिल हा लोकसंख्येच्या बाबतीत जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे. देशाची लोकसंख्या  21 कोटी आहे. ब्राझिल कोरोना महामारीचं केंद्र बनला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case will be filed against the president of Brazil 

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: