या देशात कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्काराच्या पद्धतीत झाले बदल; कसे ते वाचा

Death
Death

दफनविधीपेक्षा दहनविधीवर भर; अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांवर निर्बंध
कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू राहिलेल्या चीनमध्ये आता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींवरील अंत्यसंस्काराच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने  संसर्गाला बळी पडलेल्या नागरिकाचे दफन करण्याऐवजी दहन करण्याचे निर्देश दिले आहेत. बाधित असलेला मृत नागरिक कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचा मृतदेह जाळण्यात यावा असे सांगितले आहे. याशिवाय युरोप, अमेरिका देशातही बाधित रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी नियमावली केली आहे. इटलीत नातेवाईकांना पार्थिव पाहण्याची देखील परवानगी नाकारली जात आहे. 

चीनमध्ये डिसेंबरपासून कोरोनाचा हाहा:कार माजला आहे. सद्यस्थितीत रुग्णांचे आणि मृतांचे प्रमाण कमी झाले असले तरी फेब्रुवारी, मार्च महिन्यात हा आकडा दररोज शेकड्याने, हजाराने वाढत असे. मृत व्यक्तींची वाढलेली संख्या आणि संसर्गाची भीती लक्षात घेता दफनविधी ऐवजी दहन करण्याचे आदेश दिले गेले. रुग्णालयात एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी आणि मृतदेह स्मशानभूमित नेताना काय काळजी घ्यावी, याबद्धलही सूचना राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिल्या. अर्थात  चीन सरकारच्या आदेशावरून मोठा वाद झाला होता.

नातेवाईकांना अस्थी देण्यास मनाई
वुहानमध्ये जसजशी मृतांची संख्या वाढत गेली तसतसे मृतदेहावर तातडीने अंत्यसंस्कार केले जावू लागले. एवढेच नाही तर नातेवाईक येण्यापूर्वीच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले. याशिवाय अस्थी नेण्यासाठी रुग्णालयात येण्याची नातेवाईकांनी परवानगी मागितली असता प्रशासनाकडून मनाई करण्यात आली.  चीनमध्ये सध्या सर्व धर्मातील मृत बाधित नागरिकांना अग्नि देऊनच अंत्यसंस्कार केले गेले. वास्तविक हिंदू धर्मात मृतदेह दहन करण्याची प्रथा आहे. मात्र अब्राहमिक रिलिजियन (यहुदी, ख्रिश्‍चन आणि इस्लाम) यात  दफनविधी केला जातो. 

बेल्जियम -
बेल्जियम येथे मृत व्यक्तींचा दफनविधी केला जातो. परंतु आता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना दफन करण्याऐवजी अग्नि देऊन अंत्यसंस्कार केले जात आहेत. सध्याच्या काळात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराबाबत सरकार निर्णय घेते. 

श्रीलंका -
श्रीलंकेत देखील मृत कोरोनाबाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. जर मृताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्याच्या अंगी काही कोरोनाचे लक्षण आढळून आली असली तरी त्याला अग्नि दिला जात आहे. 

इंडोनेशिया -
कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे नातेवाईक दूर थांबतात आणि आरोग्य कर्मचारी दफनविधी करतात. अमेरिकेला देखील कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. तेथे अंत्यसंस्कारासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. तेथे रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी आहे.

अमेरिका -
अमेरिकेतील सीडीसीने बाधित व्यक्तीच्या मृतदेहास हात लावू नये, असे म्हटले आहे. मृतदेहाचे चुंबन घेणे, अंघोळ घालणे या कृतीवर बंदी आणली आहे. जर प्रथेत अंघोळीचा रिवाज असेल तर पीपीई किट घालण्याचा सल्ला दिला आहे. 

इटली -
इटलीत कारोनाचा प्रसार वाढल्यानंतर अंत्यसंस्काराचे नियम कडक करण्यात आले. रुग्णालयात मृतदेहास कॉफिनमध्ये ठेवण्यात येते. या वेळी दोन ते चार जण असतात. त्यांना मृतदेह पाहण्याची परवानगी दिलेली नाही. मृत बाधित व्यक्तीस रुग्णालयाच्या पेहरावातच दफन केले जाते.

ब्रिटन -
युरोपात ब्रिटनला देखील कोरोनाने पछाडले आहे. यात मृतव्यक्तीच्या कुटुंबीयास अंत्यसंस्काराच्या वेळी हजर राहण्याची परवानगी आहे. या ठिकाणी लवकरात लवकर अंत्यसंस्कार करावेत, अशी सूचना दिली आहे. 

इराण -
इराणमध्ये ट्रकमधून मृतदेह आणले गेले. कोणतीही प्रथा न पाळता दफनविधी केले गेले. आता कुटुंबीयांसमोर दफनविधी. 

दक्षिण कोरिया -
एखाद्याचा मृत्यू झाल्यास तीन दिवस प्रार्थना केली जाते. साधारणपणे रुग्णालयाच्या परिसरात अंत्यसंस्कार होतात. शोकसभेसाठी मूठभर लोकांना बोलावले जाते. 

इराक -
इराकमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे दफन करण्यासाठी नजफ शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर कब्रस्तान तयार केले असून तेथे दफन केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com