neil ferguson
neil ferguson

जगाला सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला देणाऱ्या शास्त्रज्ञाने प्रेयसीसाठी मोडला नियम

लंडन - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग अनिश्चितकाळासाठी थांबल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनसारख्या प्रयोगाने कोरोनाचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यावर भर दिला जात आहे. ब्रिटनमध्ये देखील कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊनची रणनिती अवलंबण्यात येत आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई देखील करण्यात येत आहे. यातून उच्च पदावर असलेल्या शास्त्रज्ञही सुटलेला नाही. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यामुळे त्याला आपल्या उच्च पदावरुन पायउतार होण्याची नामुष्की ओढावली आहे. विशेष म्हणजे संबंधित शास्त्रज्ञ कोरोनाच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होता. 

कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशभरात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात येत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर ब्रिटनमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान  जगाला सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला देणाऱ्या ब्रिटिश शास्त्रज्ञ नील फर्ग्युसन यांनीच लॉकडाऊनच्या काळात आपल्या प्रेयसीला घरी बोलवण्याची चूक केली. हा प्रकार त्यांना चांगलाच नडला आहे. ब्रिटनमधील स्थानिक वृत्तपत्र  असलेल्या द टेलिग्राफने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

'द टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार, लॉकडाऊनचा नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी नील फर्ग्युसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नील यांची प्रेयसी ही विवाहित असून आपल्या पती आणि मुलांसह ती वेगळ्या ठिकाणी रहाते, असा उल्लेखही वृत्तामध्ये करण्यात आला आहे. 

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लंडन येथील इंपेरियल कॉलेजने कॉम्पुटरवर आधारित एक खास मॉडेल तयार केले होते. या टीमचे नेतृत्व नील फर्ग्युसन यांनी केले होते. त्यांनी तयार केलेल्या मॉडेलच्या आधारावरच ब्रिटनमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. जर लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाही तर देशातील 5 लाख लोक कोरोनामुळे जीव गमावतील, असा दावा नील आणि त्यांच्या टीमने केला होता. देशासह जगाला सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून सांगणाऱ्या शास्त्रज्ञाने प्रेयसीसीठी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

23 मार्च रोजी ब्रिटनमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. जी लोक आपल्या जोडीदारांपासून वेगळी आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना भेटता येणार नाही, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या होत्या. नियमाचे उल्लंघन केल्याची नील यांनी कबूली दिली असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. युरोमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका हा ब्रिटनला बसला आहे. याठिकाणी 32 हजार हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com