esakal | ब्रिटनच्या राजघराण्यावर 'शार्ली हेब्दो'चं कार्टून; लोकांनी केली जोरदार टीका
sakal

बोलून बातमी शोधा

charlie hebdo

फ्रान्समधील 'शार्ली हेब्दो' हे मॅगझीन आपल्या निर्भयपणासाठी प्रसिद्ध आहे

ब्रिटनच्या राजघराण्यावर 'शार्ली हेब्दो'चं कार्टून; लोकांनी केली जोरदार टीका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पॅरिस : फ्रान्समधील 'शार्ली हेब्दो' हे मॅगझीन आपल्या निर्भयपणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ते नेहमी वादग्रस्त देखील ठरलं आहे. आणि आता 'शार्ली हेब्दो' पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याआधी मोहम्मद पैगंबर यांच्यावर काढलेल्या कार्टूनमुळे शार्ली हेब्दो जगभर चर्चेत आलं होतं. आता शार्ली हेब्दोमध्ये ब्रिटनच्या राजपरिवारावर कार्टून काढण्यात आलं आहे. या कार्टूनमध्ये मेगन मर्केलला जॉर्ज फ्लॉईड सारखं दाखवण्यात आलं आहे. तर महाराणी एलिझाबेथला त्याच्या मानेवर गुडघा टेकवलेलं दाखवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर या कार्टूनवर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी यावर टीका देखील केली आहे.  
मेगनने केला खुलासा
राजघराण्याला आमच्या मुलाचा रंग कसा असेल याची चिंता होती असं मर्केलनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. आर्चीचा रंग काळा असेल याची भीती राजघराण्याला होती. सध्या मेगन मर्केल दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. होणारं हे अपत्य मुलगा की मुलगी हेसुद्धा प्रिन्स हॅरीने जाहीर केलं आहे. राजघराण्यासोबत राहताना मनात आत्महत्येचे विचार येत होते, असा धक्कादायक खुलासा मेगन यांनी केला. त्यांनी म्हटलं की, मी राजघराणाऱ्यावर विश्वास ठेवला आणि हीच माझी सर्वात मोठी चूक होती. मला एकटं वाटत होतं, माझ्यावर अनेक बंधनं लादण्यात आली. मित्रांसोबत लंचला बाहेर जाण्याची परवानगी देखील नव्हती, असं देखील यावेळी मर्केलने म्हटलं होतं.

अमेरिकेत झाला होता फ्लॉईडचा मृत्यू
गेल्या वर्षी मिनियापोलिस येथे कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईड याचा पोलिस कारवाईत मृत्यू झाला होता. एका पोलिसाने फ्लॉईड याच्या मानेवर पाय दाबला होता. त्यामुळे श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेमुळे अमेरिकेच्या अनेक नागरिकांमध्ये रोष होता. लोकांनी पुन्हा एकदा 'ब्लॅक लाईव्ह मॅटर' हे आंदोलन छेडले. हजारो लोकांनी रत्स्यावर उतरुन निदर्शने केले. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसा झाल्याचंही पाहायला मिळालं. हे आंदोलन जगभरात पसरलं होतं. अनेक देशातील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन जॉर्ज फ्लॉईड याच्या हत्येचा निषेध व्यक्त केला होता. 

हेही वाचा - जॉर्ज फ्लॉइड मृत्यूप्रकरण; कुटुंबाची मोठी रक्कम घेत खटल्यात तडजोड

आता त्याच घटनेला शार्ली हेब्दोने कार्टूनच्या माध्यमातून दाखवलं आहे, मात्र फक्त यातील पात्र बदलले आहेत. यामध्ये फ्लॉईडच्या जागी मेगन मर्केलला दाखवण्यात आलं आहे. तर श्वेतवर्णीय पोलिस अधिकाऱ्याच्या जागी महाराणीला दाखवण्यात आलं आहे. मात्र, हे कार्टून लोकांना आवडलं नाहीये. अनेकांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे. 

शार्ली हेब्दोवर दहशतवादी हल्ला
मोहम्मद पैगंबरांवर कार्टून प्रकाशित केल्यामुळे शार्ली हेब्दोवर 2015 साली दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये या मॅगझीनचे संपादक तसेच अनेक कार्टूनिस्टसहित 11 लोकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी कृत्याचा जगभरात निषेध झाला होता. मात्र, शार्ली हेब्दोने निर्भयपणे आपलं कार्टून प्रकाशित करण्याचे काम तसेच चालू ठेवले आहे. 

loading image
go to top