युद्धासाठी सज्ज राहा; शि जिनपिंग यांच्या लष्करास सूचना

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 6 जानेवारी 2019

चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी त्यांच्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत, कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीला सामोरे जाण्यासाठीच लष्कराने सज्ज राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दक्षिण चिनी समुद्रात मित्रराष्ट्रांसोबत निर्माण झालेले तणावपूर्ण संबंध, तसेच तैवानसोबतच्या व्यापारामुळे अमेरिकेशी घेतलेले वाकडे या पार्श्‍वभूमीवर जिनपिंग यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत.

बीजिंग : चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी त्यांच्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत, कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीला सामोरे जाण्यासाठीच लष्कराने सज्ज राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दक्षिण चिनी समुद्रात मित्रराष्ट्रांसोबत निर्माण झालेले तणावपूर्ण संबंध, तसेच तैवानसोबतच्या व्यापारामुळे अमेरिकेशी घेतलेले वाकडे या पार्श्‍वभूमीवर जिनपिंग यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत.

चीनसमोर सध्या अनेक मोठी आव्हाने असून, सुरक्षा दलांनी संरक्षणात्मक आणि विकासात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे, असेही जिनपिंग यांनी नमूद केले. जिनपिंग हे चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे अध्यक्ष असून, संरक्षणासंबंधीचे सर्व धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. मागील शतकभरामध्ये झाले नाहीत अशा बदलांना चीन सामोरे जात असून, चीनच्या दृष्टीने हा कालखंड महत्त्वाचा आहे, विकास घडवून आणण्यासाठी चीनकडे हीच मोठी संधी असल्याचे जिनपिंग यांनी नमूद केले.

तैवानवर लक्ष 
सुरक्षा दलांना नव्या युगाची रणनीती तयार करावी लागेल, संयुक्त मोहिमांच्या क्षमता वाढविण्याबरोबरच आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्याची तयारीही त्यांनी ठेवायला हवी. तैवानच्या एकीकरणाबरोबरच या बेटाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी बळाचा वापर करण्याचा पूर्ण अधिकार चीनकडे आहे, असेही जिनपिंग यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China’s Xi Jinping tells military advisers to prepare ‘for fighting a war’