चीनच्या सिचुआन प्रांताला भूकंपाचे दोन धक्के; 11 ठार, 122 जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

चीनच्या सिचुआन प्रांताला काल (सोमवार) रात्री आणि आज (मंगळवार) सकाळी बसलेल्या भूकंपाच्या दोन धक्क्यांमध्ये 11 जण ठार झाले असून 122 जण जखमी झाले आहेत.

बीजिंग : चीनच्या सिचुआन प्रांताला काल (सोमवार) रात्री आणि आज (मंगळवार) सकाळी बसलेल्या भूकंपाच्या दोन धक्क्यांमध्ये 11 जण ठार झाले असून 122 जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास यिबीन शहराच्या चांगिंग काउंटी भागात भूकंपाचा पहिला धक्का बसला. हा धक्का 6 रिश्टर स्केल इतका नोंदविला गेला. त्यानंतर आज सकाळी आलेला दुसरा धक्का 5.3 रिश्टर स्केल इतका नोंदविला गेला आहे.

पीडितांसाठी 5 हजार टेंट
प्रांतीय राजधानी असलेल्या चेंगदूमधील अत्यावश्यक सूचना प्रणालीने भूकंपाच्या एक मिनिटापूर्वी लोकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. यानंतर भूकंपाचा पहिला तीव्र धक्का बसला. भूकंपाची तीव्रता जाणवल्यानंतर आणीबाणी व्यवस्थापन मंत्रालयाने तात्काळ मदत कार्य हाती घेतले. पाठोपाठ भूकंप प्रवण क्षेत्रात बचाव पथकाला पाठविण्यात आले. राष्ट्रीय खाद्य मंत्रालयाने भूकंप प्रवण भागातील लोकांसाठी पाच हजार तंबू, 10 हजार बेड आणि 20 हजार पांघरूणांची सोय केली आहे. 63 ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पाठविण्यात आल्या असून 302 अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.

मेइदोंग शहरातील हॉटेल जमीनदोस्त
भूकंपामुळे मेइदोंग भागातील एक हॉटेल भूकंपाच्या धक्क्यात जमीनदोस्त झाले. सिचुआनच्या लुझोऊ शहरातील यिबिन आणि जुयॉन्ग काउंटीला जोडणारा महामार्ग दुभागला गेल्याने महामार्गावरील वाहतूक त्याक्षणी बंद करण्यात आली.

संचार व्यवस्था कोलमडली
मेइदोंग आणि शुआंगे शहरातील संचार व्यवस्थेत भूकंपामुळे व्यत्यय निर्माण झाला. ही दोन्ही शहरे भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ आहेत. स्थानिक पोलिस लोकांना बाहेर काढण्यात व्यस्त असून भूकंप प्रवण भागात डॉक्टर, अग्निशमन दल आणि इतर बचाव पथकाचे कर्मचारी मदत कार्यात सहभागी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In China 11 people killed and 122 injured in two strong earthquakes