चीन बनला जगातला सर्वात 'श्रीमंत देश'; जाणून घ्या 20 वर्षात अमेरिकेची किती वाढली संपत्ती? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China

जगाचा 'बॉस' म्हणवणारी अमेरिका (America) आता प्रत्येक आघाडीवर चीनच्या (China) मागे सरकताना दिसतेय.

चीन बनला जगातला सर्वात 'श्रीमंत देश'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : जगाचा 'बॉस' म्हणवणारी अमेरिका (America) आता प्रत्येक आघाडीवर चीनच्या (China) मागे सरकताना दिसतेय. यावेळी चीननं अमेरिकेचा पराभव करत जगातील (World) सर्वात श्रीमंत देशाचा (Richest Country) मान पटकावलाय. गेल्या 20 वर्षांत जगाच्या संपत्तीत तिप्पट वाढ झालीय. या सगळ्यात सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणजे, चीनमध्ये यापैकी एक तृतीयांश मालमत्ता आहे. जगभरातील देशांच्या ताळेबंदांवर लक्ष ठेवणाऱ्या मॅनेजमेंट कन्सल्टंट मॅकिन्से अॅण्ड कंपनीच्या (Management Consultant McKinsey & Company) संशोधन शाखेच्या अहवालानुसार, चीन आता जगातील सर्वात श्रीमंत देश बनलाय.

चीन आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अमेरिकेच्या संपत्तीचा मोठा हिस्सा काही श्रीमंत लोकांपुरताच मर्यादित असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय. अहवालानुसार, या दोन श्रीमंत देशांत लोकसंख्येच्या दहा टक्के लोकांकडे सर्वाधिक संपत्तीय. तर, देशांत श्रीमंतांची संख्या झपाट्यानं वाढत असून श्रीमंत आणि गरीब देशांमध्ये मोठी तफावत दिसून येतेय. अहवालानुसार, सन 2000 मध्ये जगाची एकूण संपत्ती $156 खरव डॉलर इतकी होती, जी 2020 मध्ये म्हणजेच, 20 वर्षांनी वाढून $514 खरव डॉलर झालीय. मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटचे सहयोगी जान मिशके म्हणाले, जगातील अनेक देश अधिकाधिक श्रीमंत झाले आहेत, असं त्यांनी नमूद केलंय. अहवालात असंही म्हटलंय, की जागतिक एकूण संपत्तीपैकी 68% संपत्ती स्थिर मालमत्तेच्या रूपात आहे, तर उर्वरितमध्ये पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री आणि उपकरणे यांचा समावेश आहे.

हेही वाचा: विंचू चावला... 3 ठार, 500 जखमी! वादळामुळे विंचवांची दहशत

अहवालातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, सन 2000 मध्ये चीनची एकूण संपत्ती $7 खरव डॉलर होती, जी 2020 मध्ये वेगाने वाढून $ 120 खरव डॉलर इतकी झालीय. सन 2000 च्या आधीच चीनचा जागतिक व्यापार संघटनेत समावेश होता. तेव्हापासून चीनची अर्थव्यवस्था किती वेगाने वाढलीय, याचा अंदाज यावरून लावता येईल. 20 वर्षात जगानं मिळवलेल्या संपत्तीपैकी एक तृतीयांश संपत्ती चीनकडे आहे. त्याचबरोबर अहवालात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेची संपत्ती 20 वर्षांत दुप्पट झालीय. अहवालानुसार, 2000 मध्ये अमेरिकेची संपत्ती 90 खरव डॉलर इतकी होती.

loading image
go to top