चीनचा खोडकरपणा सुरुच, कोरोनाविषयी अभ्यास करणाऱ्या टीमला रोखलं; WHO चे प्रमुख नाराज

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

चीनने जागतिक आरोग्य संघटनेच्या एका टीमला आपल्या देशात येण्यापासून थांबवलं आहे.

नवी दिल्ली : जगभर कोरोना व्हायरस पसरण्यामागचे वास्तव काय आहे? चीनमधील वुहान शहरामध्ये याची निर्मिती झाली त्यामागचे रहस्य काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरावरचा पडदा दूर सारला जाऊन वास्तव जगासमोर यावं असं चीनला वाटत नाहीये. आणि हे वास्तव जगासमोर येऊच नये, यासाठी चीनदेखील प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. चीनने जागतिक आरोग्य संघटनेच्या एका टीमला आपल्या देशात येण्यापासून थांबवलं आहे. ही टीम चीनमधील कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीबाबत अभ्यास करण्यास तिकडे जात आहे. टीमच्या सदस्यांना अद्याप व्हिसा मंजूर झाला नाहीये, असं कारण देत चीनने त्यांना रोखलं आहे. 

चीनने अद्यापही करोना व्हायसरसाठी कारणीभूत ठरलेल्या कारणांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीमला प्रवेश दिला नसल्याने टेड्रोस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिनिवा येथून ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर एडनॉम ग्रेबेसियस यांनी चीनच्या या हरकतीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या टीमला चीनमध्ये प्रवेश देण्याविषयी चीनला फोन केला होता. त्यांनी म्हटलंय की, मी या बातमीने खूपच निराश झालोय की, आधीच टीममधील दोन सदस्य आपल्या प्रवासात आहेत आणि बाकीच्या सदस्यांना ऐनवेळी प्रवास करु दिला नाही. त्यांनी पुढे म्हटलं की, मी वरिष्ठ चीनी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि मी त्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलं आहे की, हे मिशन जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय टीमच्या प्राधान्यक्रमाचा भाग आहे. 

हेही वाचा - Corona Update : राज्यात नवे 3,160 रुग्ण; गेल्या 24 तासांत देशात 264 मृत्यू

ट्रेडोस यांनी म्हटलं की, त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की हे मिशन संयुक्त राष्ट्र संघाच्या आरोग्य संघटनेचा प्राधान्यक्रमात आहे तसेच त्यांना हे आश्वासन दिलं गेलं होतं की, चीन यासाठीच्या अंतर्गत प्रक्रिया गतीने पूर्ण करत आहे. त्यांनी म्हटलं होतं की आम्ही हे मिशन लवकरात लवकर सुरु करु इच्छित आहोत. जगभरातील तज्ज्ञ लोक जिथे कोरोना व्हायरस सापडला त्या वुहानला पोहोचण्याची शक्यता आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्ती कार्यक्रमाचे प्रमुख मायकल रेयान यांनी म्हटलं की, तज्ज्ञांना मंगळवारी तिथे पोहोचणे अपेक्षित होतं. मात्र त्यांना तिथे व्हिसासहित इतर आवश्यक मंजूरी दिल्या गेल्या नाहीयेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्हायरसच्या वाढत्या प्रकोपाच्या दरम्यानच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांची भेट घेतली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china blocks entry who team studying covid19 origins tedros adhanom ghebreyesus