विमानांच्या घुसखोरीवरून  तणाव; युद्धसराव टिपल्याचा चीनचा आरोप

वृत्तसंस्था
Thursday, 27 August 2020

विशेष म्हणजे अमेरिकेच्या या विमानांनी घुसखोरी केली तेव्हा चिनी लष्कराचा युद्धसराव सुरू होता. आमच्या लष्कराच्या हालचाली अमेरिकेच्या विमानाने टिपल्याचा आरोप चीनकडून करण्यात आला आहे.

बिजिंग - सीमावर्ती भागांमध्ये सातत्याने भारतविरोधी कारवाया करणाऱ्या चीनने अमेरिकेशीही पंगा घेतला आहे. दुसरीकडे अमेरिकेने आता चीनच्या लष्करी कारवायांवर बारकाईने नजर ठेवायला सुरुवात केली असून अमेरिकी हवाई दलाच्या हेरगिरी करणाऱ्या ‘यू-२’ या स्पाय प्लेनने आमच्या भागामध्ये घुसखोरी केल्याचा आरोप चीनने केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या या विमानांनी घुसखोरी केली तेव्हा चिनी लष्कराचा युद्धसराव सुरू होता. आमच्या लष्कराच्या हालचाली अमेरिकेच्या विमानाने टिपल्याचा आरोप चीनकडून करण्यात आला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अमेरिकेच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली असून ही उघड चिथावणी असल्याचे वु कियान यांनी म्हटले आहे. अमेरिकेने अशा प्रकारच्या कारवायांपासून दूर राहावे असा दम चीनने भरला आहे. चीनच्या उत्तर आघाडीच्या लष्कराकडून सराव सुरू असताना अमेरिकेच्या विमानाने घुसखोरी केल्याचे लष्कराच्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान ही घुसखोरी नेमकी कधी आणि कोठे झाली? याची माहिती मात्र चीनने दिलेली नाही. 

घुसखोरीची आवश्‍यकता नाही 
अमेरिकेच्या हवाई दलाने मात्र चीनचे आरोप फेटाळून लावले आहेत, आम्ही सीमेचे पालन करतच आमचे काम केले असून आम्हाला एखादी माहिती घेण्यासाठी चीनच्या हद्दीमध्ये घुसखोरी करण्याची आवश्‍यकता नाही. आम्ही काही मैल दूरवरूनच चीनमध्ये काय सुरू आहे? याची माहिती गोळा करू शकतो असे अमेरिकी हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सीएनएन या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 

काय आहे ‘यू-२’ विमान 
‘यू-२’ ही खास हेरगिरीसाठी वापरली जाणार विमाने सर्वप्रथम १९५० मध्ये वापरण्यात आली होती, ही विमाने सत्तर वर्षे जुनी आहेत. त्यानंतर या विमानांमध्ये अनेकदा सुधारणाही करण्यात आल्या. सध्या अमेरिकेकडे यापेक्षाही अधिक शक्तिशाली विमाने असल्याचा दावा केला जातो. ‘यू-२’ हे विमान आकाशामध्ये सत्तर फूट उंचावरून देखील जमिनीवरील सूक्ष्म हालचाल टिपू शकते. याचा फोटो घेण्याबरोबरच त्याचा एचडी व्हिडिओ बनविण्याची क्षमता असणारे तंत्रज्ञान या विमानामध्ये वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे विमानभेदी क्षेपणास्त्र देखील या विमानाचे काहीही वाकडे करू शकत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china complains US U-2 planes of infiltrating

Tags
टॉपिकस
Topic Tags: