चीनने आपली पहिली कोरोना लस आणली जगासमोर; लॉन्चिंग कधी होणार जाणून घ्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 7 September 2020

सिनोव्हक कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने लस बनवण्याआधीच उत्पादनासाठी फॅक्टरी बनवली आहे.

बिजिंग- चीनने जगासमोर आपली पहिली कोरोना लस आणली आहे. ही लस चीनची सिनोव्हक बायोटेक आणि सिनोफॉर्म या दोन कंपन्यांनी मिळून तयार केली आहे. असे असले तरी या लशीला आता बाजारात आणले जाणार नाही. रिपोर्टनुसार, चिनी लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. या लशींचे मानवी चाचणीचे पहिले दोन टप्पे यशस्वी ठरले आहेत. आता तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ही लस बाजारात आणली जाईल. २०२० च्या शेवटापर्यंत ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे. 

अखेर प्रतिक्षा संपली; रशियाची कोरोना लस याच आठवड्यात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध

लशीच्या उत्पादनासाठी फॅक्टरी तयार

सिनोव्हक कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने लस बनवण्याआधीच उत्पादनासाठी फॅक्टरी बनवली आहे. दरवर्षी ३० कोटी डोस तयार करण्याची कंपनीची क्षमता आहे.  सोमवारी चीनने लशीबाबत कार्यक्रम आयोजित करुन याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली. याआधी चीनने लशींच्या निर्मतीची माहिती लपवली होती.

जगभरातील १० लस अंतिम टप्प्यात

जगभरातील १० लस अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. त्यात चीनच्या लशीचाही समावेश आहे.  सध्या अनेक देश कोरोना महामारीच्या संकटातून वर येण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आर्थिक पातळीवरही त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोणत्या लशीचा सर्वात आधी मान्यता मिळेल याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

गरीब देशांनाही कोरोना लस वेळेत मिळणार; ‘युनिसेफ’ने घेतली मोठी मोहीम हाती

कोरोना पसरवल्याने चीनवर टीका

कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या वुहान शहरातून झाला होता. चीनने सुरुवातील याबाबतची माहिती लपवली होती. त्यामुळे चीनवर टीका होत आहे. याचमुळे चीन लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी इच्छूक आहे. चीनने आपल्या काही नागरिकांना आणि सैनिकांना कोरोनावरील लस दिल्याच्या बातम्याही येत होत्या. चीनच्या आरोग्य विभागाने शनिवारी खुलासा केला की, २२ जूलै पासूनच नागरिकांना डोस दिला जात होता. चीनने आपल्या चार कोरोना लशी तिसऱ्या टप्प्यात गेल्याचा दावा केला आहे. मात्र, कोणती लस नागरिकांना देण्यात आली आहे. याबाबत चीनने माहिती दिली नाही. शिवाय चीनने लोकांना देण्यात आलेली लस प्रभावी असल्याचं म्हटलं आहे.

वुहानची नकारात्मक प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न

चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा प्रसार झाला. चीन वुहान शहराची तयार झालेली नकारात्मक प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचमुळे चीन या शहराकडे जास्त लक्ष देताना दिसत आहे.

(edited by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china gave information about its first corona vaccine