चीनपासून ब्रिटनला मोठा धोका; पंतप्रधानपदाचे उमेदवार सुनक यांचे टीकास्त्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

china largest threat to uk has targeted india us says rishi sunak london
चीनपासून ब्रिटनला मोठा धोका; पंतप्रधानपदाचे उमेदवार सुनक यांचे टीकास्त्र

चीनपासून ब्रिटनला मोठा धोका; पंतप्रधानपदाचे उमेदवार सुनक यांचे टीकास्त्र

लंडन : ब्रिटनमधील पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सुनक यांनी आज थेट चीनवर टीकास्त्र सोडले. या शतकामध्ये चीनकडून ब्रिटन आणि जगाची सुरक्षा आणि संपन्नतेला मोठा धोका असल्याचे सांगत या देशाने भारतासह अमेरिकेलाही लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. सत्तेमध्ये आल्यानंतर आपण नेमके काय करणार याचा आराखडाच सुनक यांनी ब्रिटिश जनतेसमोर मांडला आहे. चीनच्या तांत्रिक आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी ‘नाटो’च्या धरतीवर मुक्त देशांची लष्करी आघाडी उभारण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. ब्रिटनमधील तीस कन्फ्युशियस संस्था बंद करण्याची घोषणा सुनक यांनी केली असून जगामध्ये आपल्याच देशात या सर्वाधिक संस्था असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चीन आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाचा ब्रिटन आणि जगाच्या सुरक्षेला तसेच संपन्नतेला मोठा धोका असून चीनच्या सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी मुक्त देशांची नवी आंतरराष्ट्रीय आघाडी उभारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तंत्रज्ञानातील सुरक्षिततेच्या अनुषंगाने नव्या तंत्राची आदानप्रदान करण्यावर भर दिला जाणार आहे. चीनने आतापर्यंत अमेरिकेपासून ते भारतापर्यंत अनेक देशांना वारंवार लक्ष्य केल्याचे दिसून येते. ड्रॅगनच्याविरोधात आपण सगळ्या देशांची मोठी आघाडी उभारू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या नव्या सुरक्षाविषयक आघाडीच्या माध्यमातून ब्रिटन सायबर आणि दूरसंचार सेवेतील सुरक्षेच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय मानके आणि नियमांवर प्रभाव टाकण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करेल तसेच बौद्धिक संपदेच्या चोरीलाही पायबंद घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे ‘रेडी फॉर ऋषी’च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

चीनकडून तंत्रज्ञानाची चोरी

सध्या चीन ब्रिटनचे तंत्रज्ञान चोरून विद्यापीठांमध्ये घुसखोरी करत असून युक्रेनवरील पुतीन यांच्या फॅसिस्ट आक्रमणाला देखील त्यांचाच पाठिंबा असल्याचे दिसते. तैवानसोबत देखील बदमाशी केली जात असून शिनजियांग आणि हॉँगकाँग प्रांतामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात आहे. या देशांच्या चलनाची मुस्कटदाबी करण्याचे काम चीनकडून सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

कनफ्युशियस इन्स्टिट्यूटला चीनची रसद

विकसनशील देशांना भरमसाठ कर्ज देऊन त्यांच्यावर चीनकडून दबाव आणला जात असून अनेक देशांच्या प्रमुखांच्या डोक्यावर राजनैतिक बंदुका ठेवण्याचे काम चीनकडून केले जात आहे. ते स्वतःच्या लोकांचा छळ करत त्यांना ताब्यात घेतात. शिनजियांग आणि हॉँगकाँगमध्ये हेच दिसून आले असे सुनक यांनी सांगितले. चीनला सॉफ्ट पॉवर म्हणून प्रमोट करण्याचे काम सुरू असून सध्या सर्वच ब्रिटिश शाळांमध्ये मांदारिन भाषा शिकविली जाते. यावर ब्रिटिश सरकारदेखील मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करते. याच्या सगळ्याच्या मुळाशी कनफ्युशियस इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेला चीनकडून वित्तपुरवठा होतो असेही सुनक म्हणाले.

Web Title: China Largest Threat To Uk Has Targeted India Us Says Rishi Sunak London

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..