पाकिस्तानमध्ये चिनी कैदी बांधत आहेत रस्ते...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 मार्च 2018

चीनमधील तुरुंगांमधून आणण्यात आलेल्या कैद्यांची पाकिस्तानमधील रस्ते बांधण्यासाठी नेमणूक झाली आहे. त्यांच्या विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असू शकतो. यामुळे यासंदर्भात सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करणे आवश्‍यक आहे

इस्लामाबाद - चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामधील (सीपेक) विविध प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाण चिनी कैद्यांचा वापर करुन घेण्यात येत असल्याचा आरोप पाकिस्तानमधील नवाब मोहम्मद युसुफ तालपूर या पाकिस्तानमधील विरोधी पक्षामधील नेत्याने केला आहे. डॉन या पाकमधील प्रसिद्ध वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. चीनने या प्रकल्पांतर्गत पाकिस्तानमध्ये तब्बल 60 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

"चीनमधील तुरुंगांमधून आणण्यात आलेल्या कैद्यांची पाकिस्तानमधील रस्ते बांधण्यासाठी नेमणूक झाली आहे. त्यांच्या विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असू शकतो. यामुळे यासंदर्भात सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करणे आवश्‍यक आहे,'' असे तालपूर म्हणाले. एका देशामधील कैदी दुसऱ्या देशात इतक्‍या सहजी पाठविता येणे शक्‍य नसल्याने चीन व पाकिस्तानमध्ये यासंदर्भात एखादा गुप्त करार झाला असण्याची शक्‍यता तालपूर यांनी व्यक्त केली आहे.

चीनच्या एकंदरच आशियाविषयक धोरणामध्ये पाकिस्तानचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या पार्श्‍वभूमीवर "सीपेक'ची सुरक्षा अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china pakistan cpec asia