
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ काल संपुष्टात आला.
बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ काल संपुष्टात आला. त्यानंतर लगेचच चीनने बुधवारी ट्रम्प प्रशासनातील 28 माजी अधिकाऱ्यांच्या विरोधात बंदी आणली आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीनंतर काही वेळातच चीनने ट्रम्प प्रशासनात परराष्ट्र मंत्री राहिलेल्या माइक पोम्पिओ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन आणि संयुक्त राष्ट्रातील राजदूत केली क्राफ्ट यांच्यावर प्रवास आणि व्यावसायिक व्यवहार करण्यावर बंदी आणली आहे.
चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये गंभीरपणे हस्तक्षेप करणाऱ्या उन्मत्त कृत्यांमुळे माजी परराष्ट्र सचिव माईक पोंपिओ यांच्यासह अमेरिकेच्या 28 मंत्र्यावर चीनने निर्बंध लादले आहेत. यामध्ये ट्रम्प प्रशासनात आर्थिक सल्लागार राहिलेले पीटर नवारु, डेविड स्टिलवेल, आरोग्य सेवा मंत्री एलेक्स अजर तसेच माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन आणि स्टीफन बॅनन अशा मंत्र्यांवर बंदी आणली गेली आहे. ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांवर लावली गेलेली ही बंदी प्रतिकात्मक आहे मात्र अमेरिकेप्रति चीनच्या कडक भुमिकेचे दर्शन यातून होते.
हेही वाचा - अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणाचा इतिहास; कुणी किती शब्दांत आणि मिनिटांत भाषण आटोपलं?
अमेरिकेनेही घातलेत निर्बंध
याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने दक्षिण चीनच्या समुद्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेबाबत गुरुवारी त्यावर नवे प्रतिबंध आणले होते. हे प्रतिबंध आगामी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे चीनसोबतचे राजनीतीक संबंध अधिक किचकट करु शकतात. ट्रम्प प्रशासनाने आपल्या शासनकाळाच्या शेवटच्या दिवसात चीनच्या अनेक अधिकाऱ्यांवर तसेच त्यांच्या घरच्या सदस्यांवर बंदी घातली होती. त्यावेळी माइक पोम्पिओ यांनी म्हटलं होतं की, आम्ही तोवर कारवाई करणे सुरु ठेवू जोपर्यंत चीन दक्षिण चीन समुद्रात आक्रमक व्यवहार करणे बंद करत नाही.