भारतीय वंशाच्या डॉक्टर प्रति चीन आजही आहे कृतज्ञ; कास्य पुतळ्याचे करतोय अनावरण

कार्तिक पुजारी
Sunday, 30 August 2020

प्रसिद्ध भारतीय डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांच्या कास्य पुतळ्याचे उत्तर चीनमध्ये एका वैद्यकीय कॉलेजमध्ये पुढील महिन्यात अनावरण होणार आहे.

बिजिंग- प्रसिद्ध भारतीय डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांच्या कास्य पुतळ्याचे उत्तर चीनमध्ये एका वैद्यकीय कॉलेजमध्ये पुढील महिन्यात अनावरण होणार आहे. द्वारकानाथ कोटनीस यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान आणि चीनचे संस्थापक माओत्से तुंग यांच्या नेतृत्वात झालेल्या चिनी क्रांतिच्या दरम्यान पीडितांची सेवा केली होती. याची आठवण आणि त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या प्रति आभार व्यक्त करण्यासाठी चीनने हा निर्णय घेतला आहे. चीनच्या राज्य मीडियाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

डॉ. कोटनीस महाराष्ट्राच्या (Maharashtra) सोलापूर जिल्ह्याचे रहिवाशी होते. १९३८ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान चिनी लोकांच्या मदतीसाठी भारताकडून पाठवण्यात आलेल्या ५ डॉक्टरांच्या चमूमध्ये  डॉ. कोटनीस यांचाही समावेश होता. कोटनीस १९४२ च्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनामध्येही सामील झाले होते. त्याच वर्षी त्यांचे निधन झाले होते. त्यावेळी ते केवळ ३२ वर्षांचे होते. 

वृत्त संस्था शिन्हुआने दिलेल्या बातमीनुसार,  सप्टेंबरमध्ये शिजिआझुआंगमधील वैद्यकीय कॉलेजमध्ये औपचारिकरित्या डॉ. कोटनीस यांच्या कास्य प्रतिमचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यांना चीनमध्ये 'के दिहुआ'  म्हणून ओळखले जाते. चिनी क्रांतीच्या कठीण दिवसांदरम्यान कोटनीस यांनी दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल चिनी नेता माओत्से तुंग यांनी त्यांचे कौतुक केले होते. त्यांनी दिलेल्या सेवेला आठवणीत ठेवत चीनच्या अनेक शहरांमध्ये त्यांची प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. शिवाय शिजिआझुआंगमध्ये एका मोठ्या जागेत त्यांचा पुतळा विराजमान आहे. येथेच त्यांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्राहलय देखील आहे.

जगभरातील कोरोना रुग्ण अडीच कोटींवर; भारत ब्राझिलला मागे टाकण्याच्या दिशेने

१९९२ मध्ये शाळेची स्थापना

शिजिआझुआंगमधील के दिहुआ मेडिकल साईन्स सेकेंडरी स्पेशलाईज्ड स्कूलचे अधिकारी लियू वेनधु यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९२ मध्ये या कॉलेजची स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत ४५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी येथे आपली पदवी प्राप्त केली आहे. सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी कोटनीस यांच्या पुतळ्यासमोर त्यांच्याप्रमाणे काम करण्याची शपथ घेतली पाहिजे, असं लियू वेनधु म्हणाले.

चीनने भारताकडे काही डॉक्टर पाठवण्याची केली होती विनंती 

1938 मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले होते. त्यावेळी माओ यांनी भारताकडे काही डॉक्टर पाठवण्याची विनंती केली होती. पंडित जवाहरलाल नेहरु आणि सुभाषचंद्र बोस यांनी एक पत्रक काढून भारतीय डॉक्टरांना चीनमध्ये जाण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे स्तातंत्र्यासाठी लढणारा भारत दुसऱ्या एका राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी मदत करत होता. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनानंतर पाच डॉक्टरांची एक टीम चीनला पाठवण्यात आली. यात कोटनीस यांचाही समावेश होता. 

कोटनीस यांनी चीनमध्ये जीव तोडून काम केले. युद्धजन्य परिस्थितीत डॉक्टरने काम करणे केव्हाही त्रासाचे असते. कोटनीस यांनी दिवसरात्र जखमी जवानांची सेवा केली. १९४० मध्ये जपान-चीन युद्धात त्यांनी सलग ७२ तास काम केले. यावेळी त्यांनी एका मिनिटाचीही झोप घेतली नाही. यादरम्यान त्यांनी ८०० पेक्षा जास्त चिनी जवानांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना या काळात Dr. Bethune International Peace Hospital चे संचालक करण्यात आले होते.

आम्ही कोणाच्या हातातील बाहुले नाहीत; पाकिस्तानच्या कौतुकानंतर फारुख अब्दुलांनी...

रुग्णालयातील नर्सच्या पडले होते प्रेमात

युद्ध पातळीवर काम करत असतानाच १९४० मध्ये कोटनीस यांची गुओ किंगवान Guo Qinglan यांच्याशी भेट झाली. त्या Bethune रुग्णालयात नर्स होत्या. येथेच गुओ आणि कोटनीस एकमेकांच्या प्रेमात पडले. कोटनीस यांना चिनी भाषा बोलता आणि लिहिता येत होती, याने गुओ चांगल्याच प्रभावित झाल्या. १९४१ च्या डिसेंबरमध्ये या जोडप्याने लग्न केले. पुढील वर्षी गुओने एका सुंदर मुलाला जन्म दिला. मुलांचं नावही यिनहूआ Yinhua असं खास ठेवण्यात आलं. यिन म्हणजे भारत आणि हूआ म्हणजे चीन. यिनहूआ याचं वयाच्या २४ व्या वर्षीच निधन झालं. दुर्विलास म्हणजे वैद्यकीय निष्काळजीपणा त्याच्या मृत्यूचं कारण सांगितलं जातं.

माओने काढले गौरवउद्गार 

प्रचंड मेहनत आणि तणावपूर्ण काम याचा विपरित परिणाम कोटनीस यांच्या शरीरावर झाला. सततच्या कामाचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर झाले होते. १९४२ च्या डिसेंबरमध्ये, यिनहूआचा जन्म झाल्याच्या तीनच महिन्यानंतर कोटनीस यांचा मृत्यू झाला. माओ यांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला होता. 'लष्कराने आज त्यांचा हात गमावला आहे. देशाचे एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय मदतीचं चैतन्य आपण नेहमी स्मरणात ठेवू', असे गौरवउद्गार त्यांनी काढले होते. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी त्यांच्या नावाचे टपाल छापून त्यांचा सन्मान केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China to thank doctor of Indian descent Will unveil the bronze image Dwarkanath Kotnis