तैवान बळकावण्याची चीनची तयारी?; आग्नेय किनाऱ्यालगत लष्कर सक्रिय

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 October 2020

क्षेपणास्त्र तळ अद्ययावत करण्यात आले असून सर्वाधिक प्रगत आणि अतीवेगवान (हायपरसॉनिक) अशी डीफ-17 ही क्षेपणास्त्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

बीजिंग- लष्कर घुसवून तैवानचा ताबा घेण्यासाठी चीनचे लष्कर सक्रीय झाले असून त्यादृष्टिने हालचाली सुरू झाल्या आहेत. सागरी सुरक्षा दलांची क्षमता ही वाढवण्यात आली आहे. क्षेपणास्त्र तळ अद्ययावत करण्यात आले असून सर्वाधिक प्रगत आणि अतीवेगवान (हायपरसॉनिक) अशी डीफ-17 ही क्षेपणास्त्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीने तैवानवरील दडपण कायम ठेवण्यासाठी कवायतींची मालिकाच सुरू केली आहे.

तैवान हा फुटीर प्रांत असल्याचे चीन मानतो. त्याचवेळी तो परत मिळविण्याचा आणि गरज पडल्यास त्यासाठी बळाचा वापर करण्याचा निर्धारही चीनने केला आहे. त्साई इंग-वेन यांची 2016 मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून उभय देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्साई या स्वातंत्र्याच्या मागणीकडे झुकलेल्या डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या नेत्या आहेत. एकसंध चीन हे तत्त्व त्यांनी धुडकावून लावले आहे.

तैवानच्या स्वातंत्र्याला समर्थन देऊ नका, अन्यथा...; चीनची भारताला गंभीर धमकी

आग्नेय किनाऱ्यावर हालचाली

आग्नेय किनाऱ्यालगत लष्करीकरण चीन कडेकोट करीत असल्यामुळे तैवान बळकावण्याची दाट शक्यता असल्याचे मत लष्करी निरीक्षक तसेच सूत्रांनी व्यक्त केले आहे.

अद्ययावत डीएफ-१७

डीएफ-11 व डीएफ-15 ही गेली कित्येक वर्षे ठेवलेली जुनी क्षेपणास्त्र काढून तेथे डीएफ-17 हे अद्ययावत क्षेपणास्त्र बसविण्यात आले आहे. त्याचा पल्ला जास्त लांब असून लक्ष्यभेद करण्याची क्षमता आणखी अचूक आहे. कमाल पल्ला 2500 किलोमीटर असून गेल्या वर्षी राष्ट्रीय दिनाच्या संचलनात ते प्रदर्शित करण्यात आले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china tries to capture taiwan army ready on border