अमेरिकेशी व्यापार युद्ध करण्यास चीन सज्ज

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 मार्च 2018

चीनने अगोदरच अमेरिकेला इशारा देत वॉशिंग्टन जर व्यापार युद्ध करु इच्छीत असेल तर त्याला परिणाम भोगावे लागतील , असे म्हटले आहे. चीन अमेरिकेबरोबर व्यापार युद्ध करु इच्छित नाही, मात्र चीनच्या हिताला बाधा पोचत असेल तर चीन गप्प बसणार नाही, असे म्हटले आहे

न्यूयॉर्क  - अमेरिकेशी व्यापार युद्ध करण्यास चीन सज्ज झाला असून त्याची किंमत अमेरिकी नागरिक आणि अमेरिकी कंपन्यांना मोजावी लागेल, असे मत अमेरिकी-चीन संबंध अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. बोस्टन कॉलेजचे राज्यशास्त्राचे प्रोफेसर रॉबर्ट रॉस यांच्या मते, एकतर्फीरित्या व्यापार युद्ध पुकारताना सावधानता बाळगणे तितकेच गरजेचे आहे.

रॉस यांच्या मते, चीनने बाजू स्पष्ट केली आहे. तुम्हाला जर व्यापार युद्ध हवे असेल तर आम्ही (चीन) तयार आहोत. कारण चीनची अर्थव्यवस्था व्यापक अणि बळकट आहे. यासंदर्भात दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. अमेरिकन नागरिकांचे जीवनमान उंचावणाऱ्या वस्तू चीन कमी किंमतीत उपलब्ध करून देत आहे. त्यापासून अमेरिकेला फायदा होतो का? हा विचार करायला हवा आणि आपण त्या वस्तू आता बनवू शकत नाही. दुसरी बाब म्हणजे असंख्य अमेरिकी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात चीनमध्ये प्रचंड फायदा कमवत आहेत. ऍपल कंपनी असो, ब्यूक असो किंवा अन्य कोणतीही अमेरिकी कंपनी असो. अशा स्थितीत युद्ध पुकारण्याचा निर्णय हा एकमार्गी ठरत नाही का? असा सवाल रॉस यांनी उपस्थित केला आहे. चीनचा बचत दर खूप अधिक आहे तर अमेरिकेचा खूपच कमी. आपण व्यापार तुटीकडे वाटचाल करत आहोत.

दरम्यान, चीनने अगोदरच अमेरिकेला इशारा देत वॉशिंग्टन जर व्यापार युद्ध करु इच्छीत असेल तर त्याला परिणाम भोगावे लागतील , असे म्हटले आहे. चीन अमेरिकेबरोबर व्यापार युद्ध करु इच्छित नाही, मात्र चीनच्या हिताला बाधा पोचत असेल तर चीन गप्प बसणार नाही, असे म्हटले आहे. दुसरीकडे व्हाईट हाऊसने चीनच्या उत्पादकांच्या आयातीवर कारवाई करण्याचे सूतोवाच केले आहे. अमेरिकेचा चीनबरोबर 500 अब्ज डॉलरची व्यापारी तूट आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून ही व्यापारी तुट कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चीनचे असमान व्यापारी धोरणामुळे तूट निर्माण झाल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

Web Title: CHINA USA TRADE WAR