चीन एक इंचही जमीन गमावणार नाही: शी जिनपिंग

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

चीनमधील नॅशनल पीपल्स कॉंग्रेसमध्ये सुरु असलेल्या 18 दिवसीय अधिवेशनादरम्यान शी यांना तहहयात चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देण्यासाठी आवश्‍यक असलेली घटनात्मक दुरुस्ती करण्यात आली. यामुळे आता पक्ष, चिनी सैन्य या दोन मुख्य संस्थांवर पूर्ण वर्चस्व असलेले शी हे माओ झेडॉंग यांच्यानंतरचे सर्वांत शक्तिशाली चिनी नेते मानले जात आहेत

बीजिंग - ""चीन स्वत:च्या भूमीचा एक इंचही कोणाला देणार नाही. चीनकडून सार्वभौमत्वाचे सर्वतोपरी रक्षण केले जाईल,'' असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. चीनच्या अध्यक्षपदी शी यांची तहहयात निवड झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शी यांच्याकडून पुन्हा एकदा चीनची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

चीनमधील नॅशनल पीपल्स कॉंग्रेसमध्ये सुरु असलेल्या 18 दिवसीय अधिवेशनादरम्यान शी यांना तहहयात चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देण्यासाठी आवश्‍यक असलेली घटनात्मक दुरुस्ती करण्यात आली. यामुळे आता पक्ष, चिनी सैन्य या दोन मुख्य संस्थांवर पूर्ण वर्चस्व असलेले शी हे माओ झेडॉंग यांच्यानंतरचे सर्वांत शक्तिशाली चिनी नेते मानले जात आहेत. भारताबरोबरील सीमावादाबरोबरच पूर्व चिनी समुद्रामधील बेटांच्या मालकी हक्कांवरुन जपानशी; तर दक्षिण चिनी समुद्रामधील विविध बेटांवरुन तैवान व दक्षिण पूर्व आशियामधील इतर देशांशी चीनचा वाद आहे. या पार्श्‍वभूमीवर शी यांनी हा इशारा दिला आहे.

"चीनच्या सार्वभौमत्वाचे आम्ही सर्वतोपरी रक्षण करु. आमच्या मातृभूमीचे झालेले तुकडे आम्ही पुन्हा एकदा जोडू. सर्व चिनी नागरिकांची हीच महत्त्वाकांक्षा आहे,'' असे शी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China will not concede an inch of land: Xi