'चीनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती...'; भारत-चीनमधील तणावपूर्ण परिस्थितीबद्दल चीनी राजदूत काय म्हणाले पाहा

वृत्तसंस्था
बुधवार, 27 मे 2020

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते. शेजारी राष्ट्रांना आपल्या ताकदीचे प्रदर्शन दाखविण्याची चीनची जुनी खोड आहे.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील एलएसी (लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) वर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करत भारतावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न चीनने केला. मात्र, चीनचा हा प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसू लागल्यानंतर चीन आता नरमाईची भाषा बोलू लागला आहे. भारत-चीन सीमा भागातील स्थिती पूर्ववत झाली असल्याचे चीनने स्पष्ट केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये झालेल्या मतभेदांवर पडदा टाकण्याच्या हालचाली चीनने सुरू केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चायनीज ड्रॅगन आणि भारतीय हत्ती सोबत नृत्य करू शकतात, असे भारतातील चीनच्या राजदूतांनी म्हटले आहे. 'कन्फेडरेशन ऑफ यंग लीडर्स मीट'ला संबोधित करताना चीनचे राजदूत सन विडोंग यांनी आपले मत नोंदविले. ते म्हणाले, "भारत-चीन संबंध आणखी दृढ करण्याची गरज आहे. दोन्ही देशांनी आपल्या मतभेदांचा परिणाम आपल्यातील संबंधांवर होऊ देऊ नये. संवादातून मतभेदांचे समाधान काढता येऊ शकते. सध्या दोन्ही देश कोरोना व्हायरसशी झुंज देत आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांतील संबंध मैत्रीपूर्ण राखण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू."

भारत-चीन तणाव वाढला! मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची भेट

संमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व युवांना मार्गदर्शन करताना विडोंग म्हणाले की, भारत आणि चीन या दोन्ही देशांतील संबंध समजून घेणे हे एक आव्हान आहे. हे दोन्ही देश एकमेकांसाठी धोका नसून संधी निर्माण करण्याचे प्रवेशद्वार आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील तरुणांनी हे संबंध आणखी घट्ट करण्यासाठी पुढे यावे. चीनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती एकमेकांसोबत नक्कीच पुढे जाऊ शकतात. 

अमेरिका कोरोनावर मात करेल; डोनाल्ड ट्रम्प यांना विश्‍वास   

दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारत-चीन सीमा भागातील परिस्थिती पूर्णपणे स्थिर आणि नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन म्हणाले की, देशांच्या सीमांशी संबंधित मुद्द्यांवर चीनची भूमिका स्पष्ट आणि सुसंगत आहे. दोन्ही देशांत झालेल्या करारांचे काटेकोरपणे पालन आम्ही करत आहोत. 

वैज्ञानिकांना मोठे यश; covid-19 ला निष्क्रिय करणाऱ्या दोन जीवाणूंचा शोध

तत्पूर्वी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते. शेजारी राष्ट्रांना आपल्या ताकदीचे प्रदर्शन दाखविण्याची चीनची जुनी खोड आहे. मध्यंतरी डोकलाममध्येही अशाच प्रकारच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, भारत जशास तसे उत्तर देत असल्याने चीनने नरमाईची भूमिका घेणे पसंत केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinese dragon and indian elephant can dance together says chinese envoy to india