'तो' चीनचा 'ती' तिबेटची; विवाह ठरला आदर्श

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

लॉंग आणि बा यांच्या छायाचित्राला सिगात्सेच्या प्रमुख समाज केंद्रात स्थान मिळाले असून या जिद्दी जोडप्याचे कौतुक होत आहे.

सिगात्से (तिबेट) : 'तो' चिनी हान वंशाचा अन्‌ 'ती' तिबेटी असूनही त्यांचे प्रेम अखेर विवाहाच्या बंधनापर्यंत पोचले. दोन वेगळ्या समाजांतील त्या दोघांच्या प्रेमकहाणीने अस्वस्थ तिबेटमधील रूढीवादी जमातींपुढे एक आदर्श निर्माण केला. परंपरा झुगारत नवा पायंडा पाडणारे ते देशातील पहिले दांपत्य ठरले. 

लॉंग शी झॉंग आणि बा सॅंग क्‍यू बा हे दोघे प्रेमात पडले. त्यांची ही प्रणयकथा जातिभेदाच्या अडथळ्यांचा डोंगर पार करीत फुलत होती, मात्र परंपरावादी हान आणि तिबेटी समाजातील शत्रुत्वामुळे त्या दोघांना विवाहासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अखेर 2015 मध्ये लॉंग आणि बा हे विवाहबद्ध झाले. आता ते दोघेही पन्नाशीत आहेत. चीनचा स्वायत्त प्रदेश अशी ओळख असलेल्या तिबेटमध्ये हा विवाह म्हणजे जातीय एकतेचा निदर्शक ठरला आहे. आंतरजातीय विवाहासाठी शेकडो युवकांना यामुळे प्रेरणा मिळाली आहे. जातीय सलोख्यासाठी राष्ट्रीय आदर्श पुरस्कार देऊन स्थानिक सरकारनेही त्यांना गौरविले आहे. 

लॉंग आणि बाकडून प्रेरणा 
लॉंग आणि बा यांच्या छायाचित्राला सिगात्सेच्या प्रमुख समाज केंद्रात स्थान मिळाले असून या जिद्दी जोडप्याचे कौतुक केले. सरकारला समाजाच्या तळागाळात काम करण्यासाठी त्यांनी एक व्यासपीठ तयार केले असल्याचेही सांगण्यात आले. या केंद्रात 500 कुटुंबांची नोंद असून, त्यातील 40 दांपत्यांनी आंतरजातीय विवाह केले आहेत, अशी माहिती स्थानिक प्रशासनाचे अधिकारी सी डॅन यांगजी यांनी भारतीय पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिली. चीनच्या निमंत्रावरून या पत्रकारांच्या गटाने नुकतीच तिबेटला भेट दिली. 

तिबेट व अन्य ठिकाणच्या वांशिक गटांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावेत यासाठी आमचे मध्यवर्ती सरकार आंतरजातील विवाहाला प्रोत्साहन देण्याची योजना आखत आहे. 
- सी. डॅन यांगजी, तिबेटमधील सरकारी अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese Tibetan couple decided to be the ideal couple of the world